ग्रामपंचायतीतील अनागोंदी कारभार प्रकरणी कारवाईसाठी माजी उपसरपंचांचे उपोषण

पुरंदर, दि. १६ जुलै २०२०: पुरंदर तालुक्यातील नीरा ग्रामपंचायतीतील गैरकारभार प्रकरणी दोषी आधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी करीत, नीरा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य बाळासाहेब भोसले यांनी आज ग्रामपंचायत कार्यालय समोर उपोषण केले. गटविकास अधिकाऱ्यांच्या आश्वासना नंतर हे आंदोलन दुपारी तात्पुरते माघारी घेण्यात आले आहे.

पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या नीरा ग्रामपंचायतीमध्ये पाच वर्षाच्या काळात दोन्ही गटांमध्ये नेहमीच ताण तणाव पाहायला मिळाले. दोन्ही गटांनी एकमेकाला. शह-काटशह देत पाच वर्षे पूर्ण करीत आहेत. मात्र दोन्ही गटांमधील धुसफूस अजूनही सुरूच आहे. गेल्या पाच वर्षात सरपंच गट आणि उपसरपंच गट आपले काम पुढे रेटण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. अशावेळी आपलेच काम व्हावे म्हणून ग्राम विकास अधिकाऱ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न दोन्ही गटांकडून केला जातो.

यामध्ये ग्रामविकास अधिकाऱ्याला मोठी तारेवरची कसरत करावी लागली. यातूनच उपसरपंच गटाने ग्रामपंचायत कारभारात गैरकारभार होत असल्याची तक्रार गटविकास अधिकाऱ्यांकडे केली होती. चौकशीदरम्यान निरा ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमितता व गैरकारभार झाला असल्याचे सिद्ध झाल्याचे म्हणत उपसरपंच गटाने संबंधित ग्रामसेवकावर कारवाईची मागणी केली होती. यापूर्वी पंचायत समिती कार्यालयासमोर सुद्धा याबाबत माजी उपसरपंच बाळासाहेब भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण केले होते.

यावेळी तपासणी अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आला असून यावर दोषींवर तातडीने कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पंचायत समितीकडून देण्यात आले होते. मात्र याला अनेक महिने उलटून गेले तरी कोणतीच कारवाई न झालेने आज माजी सरपंच बाळासाहेब भोसले यांनी नीरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. यावेळी त्यांच्या समवेत. नीरेचे विद्यमान उपसरपंच विजय शिंदे,माजीसरपंच चंद्रराव धायगुडे, राजेश काकडे, ग्रामपंचायत सदस्य सुदाम बंडगर, ग्रामपंचायत सदस्य दीपक काकडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराज काकडे, नीरा विकास आघाडीचे निमंत्रक नाना जोशी योगेंद्र माने यांचे उपस्थितीत नीरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. याला प्रहार अपंग संघटनेच्यावतीने पाठिंबा देण्यात आला होता. प्रहार संघटनेचे मंगेश ढमाळ यांनी सुद्धा या उपोषणामध्ये सहभाग घेतला.यावेळी भाजपचे पुरंदर तालुका अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी उपोषण स्थळी. भेट देत उपोषण कर्त्यांना पाठिंबा दिला.

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाच्यावतीने उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र उपोषणकर्ते आपल्या मुद्द्यावर ठाम होते. त्यामुळे जेजुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी मध्यस्थी करत पुरंदर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे यांची उपोषणकर्त्यांशी चर्चा घडवून आणली. यामध्ये उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर पुढील दहा दिवसात चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन टोनपे यांनी दिले. यानंतर माजी उपसरपंच बाळासाहेब भोसले यांनी आपले उपोषण दहा दिवसासाठी तात्पुरते स्थगित केले आहे. असे सांगत उपोषण स्थगित केले. यावेळी बोलताना गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे म्हणाले की, संबंधितांच्या तक्रारीची चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आला आहे. याबाबत योग्य ती कारवाई करण्यासाठी पुढील दहा दिवसात पाठपुरावा करून हा विषय मार्गी लावला जाईल.

दरम्यान सरपंच गटाने उपसरपंच गटावर राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. केवळ विकास कामात अडथळे यावेत म्हणून उपसरपंच गट दबावतंत्राचा वापर करत असल्याचे व ग्राम विकास अधिकारी अडचणीत आणून विकास कामे ठप्प करण्याचा प्रयत्न यातून होत असल्याचे अनिल चव्हाण यांनी म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा