पुणे, ३ सप्टेंबर २०२३ : झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी कर्णधार हिथ स्ट्रीक यांचे रविवारी दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर निधन झाले. त्याच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर याची पुष्टी केली आहे. ते ४९ वर्षांचे होते. १९९३ ते २००५ या काळात झिम्बाब्वेसाठी ६५ कसोटी आणि १८९ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळणारा स्ट्रीक दीर्घकाळापासून यकृताच्या कर्करोगाशी झुंज देत होता.
स्ट्रीकने कसोटी क्रिकेटमध्ये २१६ विकेट घेतल्या आणि बॅटने १९९० धावा केल्या, त्यात एक शतक आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने १८९ एकदिवसीय सामन्यांमध्ये २३९ विकेट घेतल्या आणि १३ अर्धशतकांच्या मदतीने २९४३ धावा केल्या. तो झिम्बाब्वेसाठी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.
स्ट्रीकने एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले, त्यापैकी झिम्बाब्वेने १८ सामने जिंकले आणि ४७ सामने गमावले. तीन सामन्यांत निकाल लागला नाही. स्ट्रीकने २१ कसोटी सामन्यांमध्ये झिम्बाब्वेचे कर्णधारपदही भूषवले त्यातील चार जिंकले आणि ११ गमावले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड