इंफाळ, २१ जुलै २०२३ : मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलांची नग्न धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोन महिन्यापूर्वी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाल्याने संपूर्ण देशभर खळबळ उडाली आहे. देशातील लोक रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध व्यक्त करत आहेत. काल संसदेतही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. त्यामुळे मणिपूर पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत आतापर्यंत चौघांना अटक केली आहे.
पोलिसांनी या घटनेतील मुख्य आरोपीला अटक केली आहे. हेरादास असे त्याचे नाव आहे. व्हायरल व्हिडीओच्या मदतीने पोलिसांनी त्याला थौबल जिल्ह्यातून अटक केली आहे. या व्हिडीओत त्याने हिरव्या रंगाचा टी शर्ट घातलेला होता. त्यावरून पोलिसांनी त्याला अटक केली. इतर तिघांची ओळख पटवली जात आहे. पोलीस हेरादासची कसून चौकशी करत असून त्याच्याकडून इतर लोकांची नावे आणि त्यांचा पत्ता जाणून घेत आहेत.
दोन महिलांची नग्न धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानतंर मणिपूरमध्ये तणाव वाढला आहे. ही घटना कांगपोकपी जिल्ह्यातील आहे. ४ मे रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपींना मृत्यूदंड देण्याचा सरकार विचार करत आहे. या घटनेतील आरोपींना बुधवार आणि गुरुवारी रात्री दीड वाजता अटक केल्याचे मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी सांगितले.
पोलिसांनी या प्रकरणी अपहरण, साामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. इतर आरोपींचाही पोलीस शोध घेत आहेत.आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी १२ पथकांची स्थापना केली आहे. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार ८०० ते १००० लोक अत्याधुनिक शस्त्र घेऊन बी.फेनोम गावात घुसले होते. या जमावाने गावातील मालमत्तेची तोडफोड केली.लुटमार केली. अनेक घरे जाळून टाकली.या जमावाने एका व्यक्तीला जागीच मारून टाकले. त्यानंतर तीन महिलांना नग्न होण्यास भाग पाडले. त्यातील एका २१ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला. यावेळी तिच्या १९ वर्षीय भावाने विरोध करण्याचा प्रयत्न केला तर त्याची हत्या करण्यात आली.
दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावरून आपला राग, संताप आणि चीड व्यक्त केली आहे. काल संसदेतील दोन्ही सभागृहात काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी या घटनेवरून जोरदार हंगामा केला. देशातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचे सांगत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आणि तीव्र शब्दात या घटनेचा निषेध नोंदवला.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर