बारामतीत चौदा दिवस जनता कर्फ्यु

8

बारामती ,४ सप्टेंबर २०२०: बारामतीच्या नगराध्यक्ष यांच्या आवाहनानंतर बारामती तालुका व शहर दि. ७ सप्टेंबर ते २१ पर्यंत जनता कर्फ्यु राहणार आहे. शहरातील अत्यावश्यक सेवा व मेडिकल वगळता संपूर्ण शहरात कडक लॉकडाऊन असणार आहे. याबाबत आज नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे यांनी पत्रकारांच्या बैठकीत माहिती दिली. शहरातील मागील चार दिवसांतील कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या ४०% एवढी आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवा ढासळू नये यासाठी चौदा दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर केला आहे.
     

बारामती शहर सोमवार पासून कडकडीत बंद राहणार आहे. यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. पुढील चौदा दिवस कोणालाही अत्यावश्यक सेवा वगळता घरातून बाहेर पडता येणार नाही, तसेच शहरातून बाहेर किंवा बाहेरील कोणालाही शहरात येता येणार नाही. कडक बंदोबस्त करण्याचे कारण म्हणजे तालुक्यातील कोरोना संसर्गाने बळी जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. शहरातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व सर्व बारामतीकरांनी सहकार्य करावे.
     

या जनता कर्फ्युसाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे, असे आवाहन तावरे यांनी यावेळी केले. शहरातील खाजगी डॉक्टरांनी कोविडच्या कामात हलगर्जीपणा किंवा टाळाटाळ केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. बारामती तालुक्यात ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आहेत तिथे जनता कर्फ्यु राहणार आहे. तर तालुक्याबाहेरील कोणालाही शहरात येता येणार नाही. प्रत्येक गावातील लोकांनी अत्यावश्यक सेवा वगळता आपल्या गावाची वेस बंद करायची आहे. शहरात कोणत्याही प्रकारचे व्यवसाय, हातगाडी, अन्य विक्रेते सुरू राहणार नाहीत. यामुळे देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.
     

तालुक्यातील नागरिकांनी कोरोना संसर्गाच्या संदर्भात माहितीसाठी डॉ. मनोज खोमणे तर शहरातील नागरिकांनी डॉ. सदानंद काळे व डॉ. पंकज गांधी यांच्याशी व्हाट्सएपवर संपर्क साधायचा आहे. तसेच आपल्या जवळील खाजगी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. आता कोरोना संसर्गाची तपासणी केल्यास रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव आल्यास त्याला तेथून सरळ हॉस्पिटलमध्ये नेणार आहेत. त्यामुळे त्याच्या घरच्या किंवा आसपासच्या लोकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही. तर या रुग्णांवर चौदा दिवस योग्य इलाज झाल्यास कोरोना संसर्ग आटोक्यात येईल अशी माहिती बैठकीत देण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी दादासो कांबळे, पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, नगराध्यक्ष तावरे, गटनेते सचिन सातव, जेष्ठ नगरसेवक किरण गुजर, मुख्यधिकारी किरणराज यादव हे यावेळी उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल यादव.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा