ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली सूसमध्ये २० लाखांची फसवणूक, नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

14
ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली सूसमध्ये २० लाखांची फसवणूक
ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली सूसमध्ये २० लाखांची फसवणूक

Pimpri online fraud news – ऑनलाइन गुंतवणुकीच्या माध्यमातून आकर्षक नफ्याचे आमिष दाखवून एका ४५ वर्षीय व्यक्तीची तब्बल २० लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना मुळशी तालुक्यातील सूस येथे ३१ जुलै २०२४ ते ९ ऑगस्ट २०२४ दरम्यान घडली. याप्रकरणी फसवणूक झालेल्या व्यक्तीने बावधन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात मोबाईलधारक आणि बँक खातेधारक अशा नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तींनी दोन लिंक पाठवल्या आणि एक विशिष्ट ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. या ॲपच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आकर्षक आमिष त्यांना दाखवण्यात आले. या आमिषाला बळी पडून फिर्यादीने त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर आरोपींनी वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. फिर्यादीने त्यांच्या सांगण्यानुसार एकूण २० लाख ५१ हजार रुपये विविध खात्यांमध्ये जमा केले. मात्र, त्यानंतर त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून अत्यंत चातुर्याने ही रक्कम उकळली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बावधन पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून, आरोपींचा शोध सुरू आहे. ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे