“गरजूंनाच मिळणार मोफत रेशन!” या धोरणांतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील ३,०९७ शिधापत्रिकाधारकांचे धान्य वितरण बंद करण्यात आले आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत रेशन दुकानातून धान्य न घेतल्याने अन्न व नागरी पुरवठा विभागाने ही कठोर कारवाई केली आहे. या निर्णयामुळे अपात्र लाभार्थींना वगळून खऱ्या गरजूंपर्यंत रेशनचा लाभ पोहोचवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला रेशन विभागाच्या ‘अ’ (निगडी), ‘ज’ (पिंपरी) आणि ‘फ’ (भोसरी) या तीन झोनमध्ये विभागण्यात आले आहे. यापैकी सर्वाधिक १,९४३ लाभार्थी ‘अ’ झोन (निगडी) मधील आहेत, तर ‘ज’ झोन (पिंपरी) मध्ये ७०७ आणि ‘फ’ झोन (भोसरी) मध्ये ४४७ लाभार्थींची रेशनची सुविधा थांबवण्यात आली आहे.
या कारवाईमागे केंद्र सरकारचे स्पष्ट आदेश आहेत. केंद्र सरकारने राज्यांना आयकर भरणारे, चारचाकी वाहनधारक आणि कंपनीचे संचालक अशा अपात्र लाभार्थींची यादी पाठवली आहे. या नावांना ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत शिधापत्रिका यादीतून वगळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ‘ज’ झोनमधील अपात्र लाभार्थ्यांची अंतिम पडताळणी सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर त्यांचे नाव कायमस्वरूपी वगळले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अपात्र ठरलेल्या लाभार्थींच्या जागी आता नवीन पात्र नागरिकांची निवड केली जात आहे. यामध्ये अपंग, निराधार आणि विधवा महिलांना प्राधान्य दिले जात आहे. ‘अ’ झोनचे परिमंडळ अधिकारी विजय क्षीरसागर यांनी सांगितले की, नवीन पात्र लाभार्थींची निवड प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. या निर्णयामुळे ज्यांना खरोखर मदतीची गरज आहे, त्यांना मोफत रेशनचा लाभ मिळवणे शक्य झाले आहे. ही कारवाई गरजू लाभार्थ्यांसाठी नक्कीच दिलासादायक आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































