इंदापूर, दि. ३० जून २०२०: इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आणि शहा नर्सरीचे विश्वस्त, वृक्षप्रेमी मुकुंद शहा यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या मित्र परिवाराने ११५३ झाडे लावून अनोखी भेट दिली.
यावर्षी असणारे कोरोनाचे संकट तसेच प्रत्येक नागरिकांनी घ्यावयाची काळजी या पार्श्वभूमीवर मुकुंद शहा यांनी आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले. त्यांनी आपल्या मित्र परिवाराला शुभेच्छा देण्यापेक्षा एक नवीन झाड आपल्या परिसरात लावून सोबत सेल्फी काढून मला पाठवून द्या. शुभेच्छा रुपी हीच मला भेट असेल असे आवाहन त्यांनी केले होते.
समाजशील, उपक्रमशील आणि वृक्षप्रेमीस भरभरून प्रतिसाद देत मित्रपरिवाराने आपल्या परिसरात ११५३ झाडे लावली. आणि सोबत आपले झाडा बरोबरचे सेल्फी पाठवले.
मुकुंद शहा हे नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त असून ट्रस्टच्या शहा नर्सरीच्या माध्यमातून वृक्षसंवर्धनाची त्यांनी मोठी चळवळ उभी केली आहे. इंदापूर बरोबरच अनेक तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये या नर्सरीच्या माध्यमातून वृक्षसंवर्धनाची हमी घेऊन मोफत रोपे पुरवली जातात. शेती तसेच विविध प्रकारच्या देशी आणि औषधी, पर्यावरण संतुलन साधणाऱ्या अनेक झाडा बद्दल विशेष प्रकारची आवड आणि जिज्ञासा त्यांच्यामध्ये आहे. जिज्ञासा ,प्रेम, जिव्हाळा ,आपुलकी च्या नात्यातून त्यांनी शहा नर्सरी, रोटरी क्लब तसेच नगरपरिषदेच्या माध्यमातून आपली आवड जोपासली आहे.
नगराध्यक्षा अंकिता शहा या त्यांच्या पत्नी असून नगरपालिकेच्या माध्यमातून हरित इंदापूर हा उपक्रम राबवण्यासाठी देखील ते अग्रेसर आहेत. झाडे लावून वाढदिवसाचे अनोखे अविस्मरणीय भेट दिल्याबद्दल मुकुंद शहा यांनी आपल्या मित्र परिवाराचे आभार मानले. असे उपक्रम निसर्ग संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरतील अशी प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे