गेल्या तीन महिन्यांपासून राज्याचे अन्न पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे एक एक कारनामे बाहेर येत होते. खरेतर मुंडे यांचे करुणा शर्मा यांचे प्रकरण बाहेर आले, तेव्हा भाजपने ज्या मुंडे यांच्याविरोधात आंदोलन केले, त्याच भाजपला मुंडे यांची तळी उचलण्याची वेळ आली; परंतु मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिंतोडे उडायला लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांना थेट राजीनामा घेण्याचा आदेश दिला. त्यामुळे फडणवीस यांनी राजीनामा द्यायला लावला. स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराचा दावा करून सत्तेवर आलेल्या सरकारची पहिली विकेट अवघ्या तीन महिन्यांत गेली.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी दोनच दिवसांपूर्वी जे भाकीत केले होते, ते प्रत्यक्षात आले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारला राजीनामा घेण्यासाठी आजचा अल्टिमेटम दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूरज चव्हाण आणि मुंडे यांची पाठराखण करणाऱ्या प्रा. लक्ष्मण हाके यांनी दमानिया यांच्यावर आरोप केले, तरी मुंडे यांचा पायच इतका खोलात गेला होता, की त्यांना कुणीही वाचवू शकले नाही. त्यांच्या पक्षाचे नेते अजित पवार यांनीच मुंडे यांना राजीनामा देण्याचे अप्रत्यक्ष सुचवूनही ते मंत्रिपदाची कवच कुंडले सोडायला तयार नव्हते. त्यामुळे दादांनी मुंडे यांना जणू बहिष्कृत केले होते. भारतीय जनता पक्षातून मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव होता. आ. सुरेश धस त्यांचा उल्लेख ‘आकाचा आका’ असा करीत होते. याचा अर्थ वाल्मिक कराड यांच्या पापात मुंडे यांचाही वाटा होता. मुंडे यांच्या कृष्णकृत्याची लक्तरे वेशीवर टांगली जात असताना दुबळ्या विरोधकांना सरकारची कोंडी करण्याची आयती संधी मिळाली होती. वास्तविक ज्या दिवशी कराड याच्याविरोधात ‘मोक्का’ लागला, त्याच दिवशी मुंडे यांनी राजीनामा दिला असता, तर त्यांच्या नैतिकतेची चिरफाड करण्याची संधी विरोधकांना मिळाली नसती; परंतु एका समाजाची ढाल पुढे, करून त्याच्या भांडवलावर मंत्रिपदाला चिकटून राहण्याची त्यांची कृती फार काळ चालणारी नव्हतीच. ‘मिस्टर क्लीन’ देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर मुंडे यांच्यामुळे दररोज चिखलफेक होत होती. सरकारला पाशवी बहुमत असले, तरी मुंडे यांच्या प्रकरणामुळे सरकारला बचावात्मक पवित्र्यात जावे लागले. साधनशूचिता, संस्काराची मक्तेदारी आपल्याकडेच आहे, असा दावा करणाऱ्या कथित संस्कृती रक्षकांचीही त्यामुळे गोची झाली. अजितदादांच्या पक्षाशी युती करण्यास विरोध असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शीर्षस्थ नेत्यांना तर कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली होती. मुंडे यांचे करुणा शर्मा-मुंडे यांच्यांशी संबंधित फोटो आणि त्यांच्या एका बहिणीने केलेल्या आरोपाच्या वेळीच मुंडे यांच्या चारित्र्यावर शंका घेत भाजपच्या महिला आघाडीने आणि युवा आघाडीने केलेले आंदोलन आणि आताची त्यांची बोटचेपी भूमिका यातला फरक लोकांच्या लक्षात येत होता. त्यातच करुणा यांनी मुंडे यांच्याविरोधात न्यायालयात केलेल्या दाव्यातही कौटुंबिक हिंसाचाराचा दावा मान्य केल्याने त्यांच्यावर तोंडघशी पडण्याची वेळ आली होती. एकामागून एक थपडा बसूनही सरकार ढिम्म होते.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणानंतर तर परळीच्या राखेत मुंडे किती गाडले गेले आहेत, हे दिसत होते. मराठा समाज देशमुख खून प्रकरणात एकवटल्याचे दिसल्यानंतर मुंडे यांनी आपल्या धार्मिक ‘गॉडफादर’ असलेल्या डॉ. नामदेवशास्त्री महाराजांना आपल्यासाठी बॅटिंग करायला लावली. महाराजांनी त्यांना चारित्र्याचे दिलेले प्रमाणपत्र त्यांच्या इतके अंगलट आले, की संत तुकारामांच्या भंडारा डोंगरावर आयोजित कीर्तन रद्द करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली. देशमुख हत्येप्रकरणात, मुंडे यांचे निकटवर्तीय कराड याच्यावर खंडणीचा आरोप आहे. याच प्रकरणातून देशमुख यांची हत्या झाली. देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर तर महाराष्ट्राभरातून संतापाची लाट उसळली होती. मोदी ज्या दिवशी मुंबईत होते आणि आमदारांना चांगल्या वागणुकीचे धडे देत होते, त्या दिवशी मुंडे मात्र कराडच्या कुटुंबाची भेट घेत होते, असा आरोप होता. विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांचे पानिपत केल्याच्या अभिमानात वावरणाऱ्या सत्ताधाऱ्यांना मुंडे यांचे समर्थन करावे लागत होते. देशमुख यांची हत्या ‘आवादा कंपनी’कडून मागण्यात आलेल्या खंडणी प्रकरणातून झाली. आरोपपत्रात त्याचा उल्लेख आहे. मुंडे यांचा अत्यंत जवळचा सहकारी आणि त्यांचा ‘राईट हँड’ अशी ख्याती असलेला कराड या हत्याप्रकरणाचा सूत्रधार असल्याचे सिद्ध झाले. दमानिया यांनी तर मुंडे आणि कराड याच्यातील व्यावसायिक भागीदारीचे पुरावेच जाहीर केले.
दमानिया यांना काही कळत नाही, असे म्हणणाऱ्यांना, त्यांचा उपमर्द करणाऱ्यांना आता मुंडे यांची कवचकुंडले काढल्याने परस्पर उत्तर मिळाले आहे. सुरुवातीला बीड पोलिसांनी याप्रकरणाचा गुन्हा नोंदवून घेण्यापासून ते तपासात प्रचंड कुचराई केली होती. अखेर याप्रकरणावरुन प्रचंड रोष निर्माण होताच फडणवीस यांनी देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासासाठी ‘एसआयटी’ नेमण्याचे आदेश दिले. त्यानंतर ‘सीआयडी’ आणि ‘एसआयटी’ने संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास केला. यामध्ये कराड आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग आढळून आला होता. राज्यात एकनाथ शिंदे यांचे महायुतीचे सरकार असताना त्या सरकारच्या काळातील अनेक मंत्र्यांचा कारभार वादग्रस्त होता. त्यातील तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार या दोन मंत्र्यांना वगळण्यात आले असले, तरी फडणवीस यांना नको असलेल्या काही जणांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे लागले. सरकार स्थापना, मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात त्यांना विलंब लागण्यामागेही हेच कारण असावे. भाजपला १३७ जागा मिळाल्या. बहुमतासाठी अवघ्या आठ जागांची कमतरता होती. भाजप ती कशीही भरून काढू शकत होता; परंतु मित्रपक्षांना सांभाळण्याच्या आणि त्यांच्या नाकदुऱ्या काढता काढता भाजपच्या प्रतिमेला धक्का बसत आहे.
देशमुख यांच्या हत्याप्रकरणात सुरुवातीपासून मुंडे यांना लक्ष्य करण्यात आले. बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी विधिमंडळ, संसदेपर्यंत हा विषय लावून धरला. त्यात आ. सुरेश धस आघाडीवर होते. गेल्या दोन महिन्यात मुंडे यांच्या बाबत जास्तच आरोप होत आहेत. ते जेवढे खुलासे करीत होते, तेवढे ते अडचणीत आले. देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यावर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ‘आवदा एनर्जी’ प्रकल्पातील खंडणीप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. मुंडे आणि कराड या दोघात अनेक व्यवसाय भागीदारीत आहेत. कराड हा मंत्री असल्याचा थाटात वावरत होता तसेच राज्यभर निर्णय घेत होता. त्याच्यावर मुंडे यांच्या कृषिमंत्रीपदाचा गैरफायदा घेऊन हार्वेस्टर अनुदानात मोठ्या प्रमाणात घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर मुंडे यांच्या कथित गैरव्यवहाराचे दररोज एक एक नमुने बाहेर येत आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याचे दाखवून बोगस शासन आदेश काढण्याचा नवा आरोप आता चर्चेत आहे. दमानिया आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी वेगवेगळे तपशील देऊन मुंडे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. मुंडे यांनी या प्रकरणी केलेले खुलासे तेवढे समाधानकारक नव्हते. त्यांनी दमानिया यांच्याविरोधात बदनामीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतर आ. धस यांनी काही आरोप करून बदनामीचा गुन्हा दाखल कराच असे आव्हान दिले. मुंडे यांच्या निवडणुकीच्या काळातील प्रचाराचे व्यवस्थापन ते त्यांच्या अनुपस्थितीत बीड जिल्ह्यातील कारभाराची जबाबदारी कराडच्या खांद्यावर होती, असे सांगितले जाते. कराड याने ‘आवादा’ या पवनचक्की निर्मिती कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. यावरुन कंपनी प्रशासन आणि कराड याच्यात वाद होते. या वादातून कराडचे सहकारी आवादा कंपनीत गेले होते. त्या वेळी त्यांनी तेथील सुरक्षारक्षकाला मारहाण केली होती. हा सुरक्षारक्षक मस्साजोग गावातील असल्याने सरपंच देशमुख ‘आवादा’ कंपनीत गेले होते. त्याठिकाणी देशमुख आणि गावकऱ्यांनी वाल्मिक कराडच्या टोळीच्या लोकांना मारहाण केली. या भांडणाचा डुख मनात ठेवून कराड याच्या सांगण्यावरुन त्याच्या साथीदारांनी देशमुख यांचे अपहरण करून त्यांची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या केली. देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो ‘सोशल मीडिया’वर व्हायरल झाल्यानंतर तर मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक तुटून पडले. सोमवारी रात्री झालेल्या बैठकीत मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले; परंतु ते तयार नव्हते. अखेर त्यांच्यावर भाजपतूनच तसेच मित्र पक्षातून मोठा दबाव आल्याने फडणवीस यांच्यापुढे काहीच पर्याय राहिला नाही; परंतु या सर्व प्रकरणात ‘जो हौदसे गयी, ओ बूँदसे नही आती’ अशी सरकारची अवस्था झाली.
न्यूज अनकट प्रतिनिधी, भागा वरखाडे