मुंबई, २१ जानेवारी २०२३ : उत्तर भारतात अधाप थंडीचा कडाका कायम आहे. वायव्य आणि उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. उत्तर भारतात कडाक्याची थंडी आणि धुक्याची चादर पसरली आहे. पुढील चार ते पाच दिवसांत किमान तापमानात घसरण होऊन थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शविली आहे.
उत्तर भारतात जरी थंडी जाणवत असली, तरी महाराष्ट्रात काही प्रमाणात थंडी ओसरली आहे; मात्र २८ जानेवारीपासून, राज्यातील थंडीचा प्रभाव पुन्हा वाढणार आहे. पुढील काही दिवसांत महाराष्ट्रातील तापमान दोन ते तीन अंशांनी घसरेल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात काही प्रमाणात थंडी जाणवणार असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे. या काळात उत्तर आणि पश्चिम भारतातही काही राज्यांत किमान तापमान घसरून थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शविली आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर