१ जूनपासून दररोज २०० रेल्वेच्या विशेष गाड्या धावणार: रेल्वेमंत्री पियुष गोयल

नवी दिल्ली, दि.१९ मे २०२०: सध्या कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे कामगार देशाच्या विविध भागात अडकून पडले आहेत. त्यामुळे नागरिकांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे की, १ जूनपासून दररोज २०० नॉन एसी ट्रेन धावणार आहेत. अशी माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

देशात एक जूनपासून सुरु होणाऱ्या या रेल्वेगाड्यांचे ऑनलाईन बुकिंग लवकरच सुरू होणार आहे. या ट्रेन वेळापत्रकानुसार चालवल्या जाणार आहेत, याबाबतचीही माहिती लवकरच दिली जाईल, असे पियुष गोयल यांनी सांगितले.

श्रमिक विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था रेल्वे खात्यामार्फत करण्यात येत आहे. राज्य सरकारांनी जवळच्या मोठ्या रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी कामगारांना मदत करावी. कामगारांची नोंदणी करुन त्याची यादी रेल्वेला द्यावी, असे आवाहन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राज्य सरकारांना केलं आहे.

मजुरांना आवाहन करताना रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं की, तुम्ही आहे तिथेच थांबा, तुम्हाला तुमच्या गावी पोहोचवले जाईल. देशभरात रोज शेकडो विशेष श्रमिक ट्रेन धावत आहेत. आतापर्यंत १६०० ट्रेनच्या माध्यमातून २१ लाख ५० हजार मजुरांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचवण्यात आले आहे, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा