आज पासून पुण्यात सायंकाळी ७ नंतर देखील सुरू ठेवता येणार हॉटेल पार्सल सेवा

पुणे, २५ सप्टेंबर २०२०: पुण्यातील हॉटेल व्यवसायीकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीय. याआधी पुण्यातील हॉटेल व्यवसायिकांना संध्याकाळी सात नंतर हॉटेल बंद ठेवण्याचे निर्बंध होते. तसंच पार्सल देखील सात नंतर डिलिव्हर करण्यावर बंधन होतं. मात्र, आता हे बंधन हटविण्यात आले आहे . पुण्यात आजपासून सायंकाळी ७ नंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिलीय.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील हॉटेल व्यवसायांना संध्याकाळी ७ पर्यंतच पार्सल सेवा देण्याची परवानगी देण्यात आली होती. पण या वेळेत आता वाढ करुन ती रात्री १० पर्यंत करण्यात आली आहे . याबाबत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी हॉटेल व्यावसायिकांच्या पार्सल सेवेत वाढ करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती.

काय म्हणाले शिरोळे

सरकारनं खाजगी बससेवा, लॉजेस, एसटी बससेवा यांना परवानगी दिलीय. त्याचप्रमाणं रेस्टॉरंट्सचाही विचार व्हावा असं शिरोळे यांनी निवेदनात म्हटलं आहे. तसेच पार्सल सेवा पुरविणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना सायंकाळी सातनंतरही ती सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शिरोळे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन केली होती. त्यावर आयुक्तांनी परवानगी दिली असून सर्वच क्षेत्रीय कार्यालय तातडीने कळविण्यात येईल, असं त्यांनी सांगितल्याची माहिती शिरोळे यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा