पुणे, २९ जून २०२३ : केंद्र सरकराने ऊसाच्या एफआरपी मध्ये प्रतिक्विंटल दहा रुपयांची वाढ केली आहे. नव्या हंगामात ऊसाची एफआरपी ३१५ रुपये होणार आहे. यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकारने दहा रुपयांची वाढ केली आहे ती वाढ कशाच्या आधारावर केली आहे. कोणता उत्पादन खर्च गृहीत धरला. ही एफआरपी वाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात केलेली धुळफेक आहे. अशी कडाडून टीका राजू शेट्टी यांनी केली.
केंद्र सरकारने एफआरपी मध्ये क्विंटलला दहा रुपये म्हणजेच प्रति टनास शंभर रुपयाची वाढ केली आहे. ही वाढ करुन शेतकऱ्यांना मोठी मदत केली असल्याचा सरकार डांगोरा पिटत आहे. वास्तविक पाहता केंद्र सरकारने दहा रुपयांची केलेली वाढ कोणत्या आधारे केली. उत्पादन खर्च कोणता धरला अस सवाल राजू शेट्टींनी उपस्थित केला आहे.
गेल्या वर्षभरातील वस्तुस्थिती पाहिली तर उत्पादन खर्चामध्ये जवळपास ३३% वाढ झाली आहे. यामध्ये रासायनिक खतांची वाढ ही २२% हून अधिक वाढलेली आहे. यामुळे ऊसाच्या एफआरपी मध्ये झालेली वाढ ही फक्त सव्वातीन टक्के आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. सध्या उसाची शेती ही तोट्याची शेती झाली असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
कृषी मूल्य आयोगामध्ये बसलेल्या विद्वानांनी एक टन उसाचा खर्च १५७० रुपये दाखवलेला आहे. त्या उत्पादन खर्चावर आपण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुप्पट पैसे देत आहोत, हा औडंबर माजवला जात आहे. कृषी मूल्य आयोगाने कोणत्या संशोधन केंद्रामध्ये अथवा देशातील कोणत्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये एवढ्या खर्चात ऊस काढला हे दाखवून द्यावे असेही राजू शेट्टी म्हणाले. सरकारने साखर कारखानदारांना खुश करण्यासाठी ही एफआरपी वाढवली असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला.
गेल्या पाच वर्षांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाढलेल्या महागाईचा मोठा फटका बसला आहे. यामध्ये रासायनिक खते ,मजुरी ,मशागत, तोडणी वाहतूक ,खते ,कीटकनाशके यांचे भाव गगनाला जाऊन भिडलेले आहेत. या सर्व गोष्टींचा विचार केल्यास गेल्या पाच वर्षात फक्त शेतकऱ्यांना टनाला ३५० रुपयांची वाढ मिळाली असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ऊसावरील एमएसपीमध्ये प्रति क्विंटल दहा रुपयांनी वाढवण्यात आली आहे. सरकारनं वाढवलेली एमएसपी नवीन ऊस हंगामापासून लागू होणार आहे. ही एमएसपी १ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू होणार असून पुढील वर्षी ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत लागू राहणार आहे. २०२१ मध्ये ऊसाचा एमएसपी ५ रुपयांनी वाढवून २९० रुपये करण्यात आला होती. २०२२ मध्ये त्यात १५ रुपयांनी वाढ करून ३०५ रुपये करण्यात आली.आता १० रुपयांनी वाढ झाल्याने नव्या हंगामात उसाची एफआरपी ३१५ रुपये होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर