नवी दिल्ली, ७ डिसेंबर २०२०: शेतकरी आंदोलनाचा आज अकरावा दिवस आहे. सरकारनं प्रारित केलेल्या नवीन कृषी कायद्याविरोधात शेतकरी हे आंदोलन करत आहे. शेतकरी आणि सरकार यांच्या दरम्यान पाच वेळा चर्चा झाली असून अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यात आता शेतकऱ्यांनी आठ डिसेंबरला म्हणजेच उद्या भारत बंद चा पुकार केला आहे. उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सर्व गोष्टी बंद राहतील. सिंघू सीमेवर जय किसान चळवळीतील योगेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत बंद दरम्यान ८ तारखेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत भारत बंद ठेवण्यात येणार आहे.
यासह काल झालेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये शेतकरी संघटनांनी असे सांगितले आहे की, दुपारपर्यंत चक्काजाम देखील होणार आहे. त्यामुळं वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होईल. मात्र, या दरम्यान अत्यावश्यक सेवेसाठी होणारी वाहतूक सुरू राहील. यामध्ये वैद्यकीय सेवांसाठी तसेच लग्न सोहळा या कारणास्तव वाहतूक सुरू राहील. मात्र, इतर वस्तूंची वाहतूक बंद असल्यामुळं उद्या अनेक गोष्टी उपलब्ध होऊ शकणार नाही. यामुळं दूध-फळ-भाज्यांच्या वाहतुकीवरही बंदी असणार आहे. खरंतर, शेतकऱ्यांच्या या भारत बंदला सर्वच स्तरातून पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळं ८ तारखेला म्हणजेच उद्या सर्व व्यवहार आणि वाहतूक ठप्प राहिल असं बोललं जात आहे.
राज्यातील प्रमुख एपीएमसी मार्केट बंद
दरम्यान, महाराष्ट्रातूनही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन कायद्याविरोधात राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील तमाम माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांचा मंगळवार (८ डिसेंबर) रोजी संप करण्यात निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या देशव्यापी संपात व्यापारी व माथाडी कामगार सहभागी होणार असा बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे