नवी दिल्ली, दि. १६ जून २०२० : कोविड-१९ च्या रुग्णांवर योग्य उपचार होण्यासाठी अधिक खाटांची तसेच क्रिटीकल केअर सेवांची उपलब्धता असावी आणि या आरोग्य सेवांसाठी योग्य आणि पारदर्शक पद्धतीने पैसे आकारले जावे, यादृष्टीने, खाजगी आरोग्य सेवांनाही कोविड उपचार व्यवस्थापनात सहभागी करुन घेण्यासाठी सक्रीय प्रयत्न करावेत, असे निर्देश केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.
या संदर्भात, महाराष्ट्रासह, तामिळनाडू, ओडिशा, गुजरात, उत्तरप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक आणि मध्यप्रदेश या राज्यांनी याआधीच पावले उचलली आहेत. त्यांनी खाजगी आरोग्य सेवा देणाऱ्या रुग्णालयांशी चर्चा करुन, कोविड-१९ च्या रुग्णांना माफक दरात क्रिटीकल केअर सेवा दिली जावी यासाठी करार केला आहे. राज्यांनी, कोविड उपचार व्यवस्थापनात खाजगी आरोग्य क्षेत्राला सामावून घेत, सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही आरोग्यसेवांनी एकत्र येऊन कोविड वैद्यकीय व्यवस्थापन करावे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हंटले आहे. यामुळे कोविड-१९ च्या रूग्णांना उत्तम दर्जाचे उपचार त्वरित आणि वाजवी दरात मिळू शकतील.
कोरोना संशयितांच्या नमुन्यांची चाचणी करण्याची क्षमता देशात सातत्याने वाढवली जात आहे. सध्या देशात दररोज तीन लाख चाचण्या केल्या जाऊ शकतात. आतापर्यंत देशात एकूण ५९,२१,०६९ चाचण्या करण्यात आल्या असून, गेल्या २४ तासांत, १,५४,९३४ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
आतापर्यंत देशात एकूण ९०७ प्रयोगशाळांचे जाळे उभारण्यात आले आहे. यात ६५९ सरकारी प्रयोगशाळा आणि २४८ खाजगी प्रयोगशाळा आहेत. यांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे :–
• त्वरित (रियल टाईम) आरटी-पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा :- ५३४ (सरकारी: ३४७ + खाजगी: १८७)
• TrueNat आधारित चाचणी प्रयोगशाळा: ३०२ (सरकारी: २८७ + खाजगी: १५)
• CBNAAT आधारित चाचणी प्रयोगशाळा: ७१ (सरकारी: २५ + खाजगी: ४६)
दिल्लीत चाचण्यांची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने, आता दिल्लीतील सर्व ११ जिल्ह्याला स्वतःची स्वतंत्र प्रयोगशाळा देण्यात आली असून, त्या त्या जिल्ह्यातले नमुने तिथे तपासले जाऊ शकतील. चाचण्यांचे रिपोर्ट्स, लवकर मिळावेत, यादृष्टीने प्रत्येक जिल्ह्यातील प्रयोगशाळांमध्ये पाठवले जातात. सध्या दिल्लीत एकूण ४२ प्रयोगशाळा असून, त्यांची प्रतिदिन चाचणीक्षमता अंदाजे १७,००० इतकी आहे.
द रियल टाईम पीसीआर (RT-PCR) ही कोविड-१९ च्या निदानासाठीची गोल्ड स्टँडर्ड फ्रंटलाईन चाचणी असून, त्यासाठी देशात ९०७ प्रयोगशाळा आहेत. या सर्व प्रयोगशाळांमुळे चाचणी क्षमता अधिक मजबूत झाली आहे. मात्र, या चाचण्यांसाठी विशेष प्रयोगशाळा सुविधा लागतात आणि या प्रयोगशाळांमध्ये नमुने पोहचवून त्यांचा रिपोर्ट मिळेपर्यंत २ ते ५ तास लागतात. तर TRUENAT आणि CB NAAT या पोर्टेबल चाचण्या असून, त्या दुर्गम भागातही केल्या जाऊ शकतात.
चाचणी सुविधा अधिक स्वस्त करण्यासाठी आणि चाचण्यांची विश्वासार्हता, अचूकता आणि गांभीर्य कायम राखत चाचणीक्षमता वाढवण्यासाठी, आयसीएमआर ने रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट म्हणजेच जलद जनुकरोधी चाचणी क्षमता, संदर्भात नियमावली जारी केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी