फुरसुंगी, दि. १८ ऑगस्ट २०२०: पुणे महानगर पालिकेने कचरा डेपोमध्ये उघड्यावर कचरा डंपिंग करू नये, यासाठी सोमवारपासून उरळी देवाची आणि फुरसुंगी गावातील ग्रामस्थांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. ग्रामस्थांनी या प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेतल्याने ऐन पावसाळ्यात कचरा प्रश्न पेटला आहे. उरुळी देवाची आणि फुरसुंगी या गावच्या हद्दीतील सुमारे १७३ एकर जागेत महापालिकेचा कचरा डेपो आहे. ही गावे महापालिकेत अल्यानंतरही कचरा डेपो कायम आहे. या ठिकाणी रोज सुमारे ८०० टन कचरा टाकला जातो डेपोमुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण झाली आहे.
गावातील पाण्याचे स्त्रोत दुषित झाले आहेत. परिणामी रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार करीत डेपो बंद करण्याची मागणी रहिवाशांनी लावून धरली आहे. या मागणीसाठी ग्रामस्थांनी आंदोलन केले होते . तसेच याठिकाणी महापालिकेच्यावतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो; पण तो अपुरा असल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे. त्यासाठी टँकरची संख्या वाढवावी, रस्ते वाहतुकीची साधने पाणी या सुविधा भक्कम असाव्यात या गावकऱ्यांच्या अपेक्षा आहेत.
कचऱ्यामुळे पाण्याचे स्त्रोत पूर्णपणे दूषित झाले आहेत. भविष्यात आणखी समस्यांना तोंड द्यावे लागण्याची भीती आहे येथील प्रमुख रस्ते ८० आणि १०० फुटाचे असल्याची कागदोपत्री नोंद आहे. प्रत्यक्षात मात्र त्यापेक्षा निम्मेच आहेत त्यामुळे फुरसुंगीच्या चारही बाजूंना वाहतूक कोंडीचा विळखा आहे. मुख्य रस्त्यालगत बाजारपेठेमुळे फुरसुंगीकडे येणे अशक्य होते.
यापूर्वी, ग्रामस्थांनी अनेकदा आंदोलन केले आहेत. मार्च महिन्यातही आंदोलन करण्यात आले होते यावेळी काही मागण्या मान्य होऊन आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे