लोकल रेल्वे प्रवासावर बंधने घालण्यासंदर्भात सरकारकडून आणखी स्पष्टीकरण

3

मुंबई, ६ जून २०२१: ‘ब्रेक द चेन’साठी शासनाने दि. ४ जून, २०२१ रोजी प्रसृत केलेल्या आदेशांबाबत आणखी स्पष्टीकरण करणारे एक परिपत्रक आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागातर्फे जारी करण्यात आले आहे. लोकल रेल्वेने प्रवास करण्यावर बंधने घालण्यासंदर्भात आणखी स्पष्टीकरण या परिपत्रकात देण्यात आले आहे.

या परिपत्रकानुसार लोकल रेल्वेने प्रवास करण्याच्या बाबतीत संबंधित जिल्हा व्यवस्थापन प्राधिकाऱ्याला, नागरिकांच्या प्रवासावर स्तर १, स्तर २ आणि ३ अशी अतिरिक्त बंधने घालण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. लोकल रेल्वेने प्रवास करण्याच्या नियमांअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेने याखेरीज अतिरिक्त बंधने घातली असल्यास, अशी बंधने संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी लागू राहतील, असेही या परिपत्रकात विशेषत्वाने निर्देशित करण्यात आले आहे.

मुंबई महानगर प्रदेशाच्या हद्दीत लोकल रेल्वेने प्रवास करण्याच्या बाबतीत एखाद्या जिल्हा व्यवस्थापन प्राधिकाऱ्याला आणखी बंधने लागू करावीशी वाटत असल्यास, त्यांनी ती बंधने बृहन्मुंबई महानगरपालिकेशी चर्चा करूनच लागू करावीत, अशा सूचनादेखील याद्वारे देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या संपूर्ण प्रवासादरम्यान ही बंधने सुरळीतपणे लागू व्हावीत यासाठी हे स्पष्टीकरण जारी केल्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी परिपत्रकात म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा