आजपासून मुंबईत तीन दिवस G-20 ची बैठक

मुंबई, २८ मार्च २०२३: G-20 ची बैठक आजपासून (२८ मार्च, मंगळवार) मुंबईत सुरू होत आहे. म्हणजेच मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे तीन दिवस व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्याच्या योजनांवर चर्चा करण्यासाठी बैठकांची ही फेरी चालणार आहे. या महत्त्वाच्या बैठकांमध्ये देश-विदेशातील पाहुणे सहभागी होत आहेत. यापूर्वी डिसेंबर महिन्यातही G-20 शी संबंधित बैठका आणि कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पुन्हा एकदा तीन दिवसांच्या G-20 संबंधित कार्यक्रमांच्या आयोजनामुळं शहर पूर्णपणे उजळून निघालंय.

वांद्रे, सांताक्रूझ, वांद्रे बँड स्टँड, मिठी नदी ही ठिकाणं मुंबई महापालिकेने सजवली आहेत. या कामांचा बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सोमवारी आढावा घेतला. G-20 शिखर परिषदेची पहिली बैठक डिसेंबर २०२२ मध्ये मुंबईत झाली. त्यानंतर बीएमसीने केलेल्या शहराच्या सुशोभिकरणाचं केंद्र सरकारकडून कौतुकही करण्यात आलं.

महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी आज सकाळी या सर्व ठिकाणी भेट देऊन कामांचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त (शहर) आशिष शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) व्ही. वेलारासू, सहायक आयुक्त (परिमंडळ ३) रणजित ढाकणे, उपायुक्त (विशेष) संजोग काबरे, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, सहायक आयुक्त एच. प्रभाग स्वप्नजा क्षीरसागर, एचके पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते, एचके विभागाचे सहाय्यक आयुक्त मनीष वलंजू यांच्यासह मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सहआयुक्त रामामूर्ती आदी अधिकारी या दौऱ्यात उपस्थित होते.

कार्यक्रम क्षेत्रातील रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीचं काम अल्पावधीत तत्परतेने पूर्ण करण्यात आलं आहे. उद्यान विभागाने ठिकठिकाणी ग्रीन डेकोरेशनचं काम पूर्ण केलंय. प्रकाशयोजनेचं कामही अल्पावधीत पूर्ण झालंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा