‘महाराष्ट्र त्रस्त खोके खाऊन गद्दार मस्त’ घोषणा देत, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून गद्दार दिन साजरा

पुणे २० जून २०२३: एक वर्षापूर्वी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार एकनाथ शिंदे यांच्यामुळे पडले. आजच्याच दिवशी, म्हणजे २० जूनला एकनाथ शिंदे यांनी बंड करून आपल्या चाळीस आमदारांसह उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली होती. मागच्या वर्षी याच दिवशी हे सर्व आमदार सुरत मार्गे गुवाहाटीला गेले. एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत ५० आमदार घेऊन बंड केले होते. त्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे.

याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यभरात गद्दार दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. पुण्यातही आज गद्दार दिवसाबरोबरच, खोके दिन साजरा करण्यात आला. येथील बालगंधर्व रंगमंदिर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून खोके दिन साजरा करण्यात आला. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांकडून हा गद्दार आणि खोके दिन साजरा करण्यात आला.

यावेळी ५० खोके माजलेत बोके, ‘चले जाव चले जाव- गद्दार गुवाहटी चले जाव, महाराष्ट्र त्रस्त खोके खाऊन गद्दार मस्त’ अशा घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात देण्यात आल्या. दरम्यान नाशिक मध्येही राष्ट्रवादी काँग्रेस कडून शेकडो कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गद्दार दिनाचे आंदोलन करण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा