अखेर सातारा जिल्ह्यात गजा मारणेला अटक…

6

मेढा, ७ मार्च २०२१: पप्पू गावडे आणि अमोल बधे खून खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणेच्या साथीदारांनी त्याची तळोजा कारागृहाबाहेरुन मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत ३००-४०० वाहनांचा ताफा होता. या प्रकारानंतर पुणे पोलिसांनी गाजा मारणेवर गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरू केला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत तो फरार होता. मिळालेल्या माहितीनुसार त्याने पुण्यातून साताऱ्याला पळ काढला होता. अखेर सातारा जिल्ह्यात गजा मारणे आल्याची माहिती पोलिसांनी मिळताच मेढा पोलिसांनी त्याला पाठलाग करुन पकडले.

पुणे पोलिसांना गुंगारा देऊन त्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश केला होता. गेल्या अनेक दिवस पुणे पोलिस त्याच्या मागावर होते. क्रेटा गाडीतून त्याची जावळी-महाबळेश्वरात हवा चालली होती. सातारा पोलिसांना त्याची चाहूल लागताच पोलिसांनी अगदी शिताफीने त्याला बेड्या ठोकल्या. मेढा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन गजा मारणेला जेरबंद केले आहे.

तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर गजा मारणे व त्याच्या साथीदारांनी जंगी मिरवणूक काढली होती. त्यावेळी त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला होता. या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. तसेच उर्से टोल नाक्यावर गजा मारणे याने टोल न भरणे तसेच दहशत पसरवणे असे वातावरण तयार करणे, असे गुन्हे मिरवणुकीनंतर गजा मारणेवर दाखल झाले. एकंदरित ही मिरवणूक त्याला चांगलीच महागात पडली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा