गोल पोस्ट महाराष्ट्र खासदार सुप्रिया सुळे यांची बदनामी करणारा युवक गजाआड

खासदार सुप्रिया सुळे यांची बदनामी करणारा युवक गजाआड

श्रीगोंदा दि.१९ मे २०२०: महाराष्ट्र सरकारने काही शहरांमध्ये व ग्रामीण भागात मद्यविक्रीला परवानगी दिल्याच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या फेसबुकवर खासदार सुप्रिया सुळे यांच्या फोटोसह आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

विजय पवार असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांनी या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये राज्यात सर्वत्र मद्यविक्री बंद होती.

मध्यंतरी राज्य सरकारने काही शहरांमध्ये व ग्रामीण भागात मद्यविक्रीला परवानगी दिली. त्यानंतर मद्यविक्री सुरू झाली. या निर्णयानंतर विजय पवार याने दि.५ मे रोजी स्वतःच्या फेसबुक पेजवर खासदार सुप्रिया सुळे यांचा फोटो टाकून एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. ही पोस्ट श्रीगोंदा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांनी फेसबुकवर पाहिली.

त्यामुळे त्यांनी पवार याच्याविरुद्ध सोशल मीडियावर खासदार सुप्रिया सुळे यांची बदनामी केल्याची तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी पवार याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून अधिक तपास श्रीगोंदा पोलिस करीत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष

error: Content is protected !!
Exit mobile version