गुळुंचे येथील तरुणांचा उपक्रम कौतुकास्पद ; तहसीलदार सरनोबत

नीरा : “गुळुंचे येथील तरुणांनी एकत्र येत चांगल्या प्रतीचे मास्क तयार केले आहे. हा उपक्रम कौतुकास्पद आहे.” असे प्रतिपादन पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी केले.

गुळुंचे (ता.पुरंदर) येथे तरुणांनी एकत्र येत मास्क तयार केले. आज यातील १०० मास्कचे मोफत वाटप तहसीलदार सरनोबत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
कोरोनाच्या संकटकाळात अनेकजण मदतीचा हात पुढे करताना दिसत आहेत. विषाणूशी लढण्यासाठी सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर व मास्क वापरण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. सध्या मास्क उपलब्ध होत नसून मास्कच्या किमती वाढल्या आहेत.

गोरगरीब व हातावर पोट असणाऱ्या लोकांना सहज मास्क उपलब्ध होत नाहीत.अशावेळी घरातील टॉवेल, रुमाल, पंचा यांनी पुरुष तर साडीच्या पदराने नाक बांधण्याचा प्रयत्न महिला करत आहेत. मात्र, या वस्तू जास्त काळासाठी नाकातोंडावर राहत नसल्याचे लक्षात आल्यावर येथील तरुणांनी नाड्यांचे मास्क शिवले. गावातील सुरेश निगडे व रामभाऊ कर्णवर यांनी मुलांना कापड उपलब्ध करून दिले.

अभिजित निगडे, शैला निगडे, दीपाली भापकर यांनी हे मास्क विनामूल्य शिवले. सोशल डिस्टन्सचे पालन करत मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी तलाठी गणेश महाजन, पोलीस पाटील दीपक जाधव, कोतवाल नारायण भंडलकर, हमीद शेख, संजय चव्हाण, प्रशांत जोशी, अमोल निगडे, संदीप काळे, दत्तात्रय गोरगल आदी उपस्थित होते.

तहसीलदारांनी टाकली कौतुकाची थाप –
अभिजित निगडे व त्याच्या कुटुंबीयांनी स्वतः विनामूल्य मास्क शिवल्याचे समजल्यावर तहसीलदार सरनोबत यांनी त्यांचे कौतुक करत त्यांना भेट म्हणून पुस्तके दिली. तसेच यापूर्वी येथील तरुणांनी स्वखर्चातून गरजू व्यक्तींना किराणा साहित्य वाटप केल्याचे तसेच डोंगराळ माळरानावर पक्षांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था केली जात असल्याचे समजल्यावर कौतुकाची थाप टाकली. तसेच आवश्यकता भासल्यास इतर गावांसाठी असाच उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.

“सामाजिक बांधिलकीतुन मी व माझ्या कुटुंबीयांनी मास्क शिवले. आगामी काळात ५०० मास्क शिवण्याचा मानस आहे. संकटकाळात एकमेकांच्या उपयोगी पडणे हाच मानवधर्म आहे.
-अभिजित निगडे, तरुण, गुळुंचे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा