गणेश मंदार्थी आणि ऋतुपर्णा बिश्बास यांना यंदाचा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर

गणेश मंदार्थी आणि ऋतुपर्णा बिश्बास यांना यंदाचा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर

पुणे, ८ नोव्हेंबर २०२४ : कर्नाटकातील यक्षगान कलाकार गणेश मंदार्थी आणि प्रसिद्ध नाट्य-दूरचित्रवाणी कलाकार व पश्चिम बंगालमधील ‘अमता परिचय’ या थिएटर गृपच्या सह-संस्थापिका ऋतुपर्णा बिश्बास यांना यंदाचा प्रतिष्ठित तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे. रुपवेध प्रतिष्ठान, पुणे आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात येतो.

येत्या शनिवार दि. १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४:३० वाजता टिळक रस्त्यावरील हिराबाग चौक येथील श्रीराम लागू रंग-अवकाश येथे होणाऱ्या विशेष समारंभात सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतील. रोख ५० हजार आणि मानपत्र असे तन्वीर नाट्यधर्मी पुरस्काराचे स्वरूप आहे. थिएटर अर्थात रंगभूमी या क्षेत्राला विशेष योगदान देणाऱ्या तरुण पिढीतील कलाकारांना दरवर्षी सदर पुरस्कार देण्यात येतो. सन २००४ पासून तन्वीरच्या स्मृतीमध्ये त्यांचे पालक दीपा व श्रीराम लागू यांनी या पुरस्काराची सुरुवात केली. कर्नाटकातील नीळकंठेश्वर नाट्यसेवा संघाचे (NISASAM) प्रमुख के.व्ही.अक्षरा या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. याबरोबरच ‘एक्स्पांडिंग द नोशन्स ऑफ ऍक्टिव्हिझम इन थिएटर’ या विषयावर देखील ते बीजभाषण करतील, अशी माहिती महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे सचिव राजेश देशमुख यांनी दिली.

गणेश मंदार्थी हे कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील यक्षगान कलाकार आहे. उडुपी जिल्ह्यातील यक्षगान संस्थेत त्यांनी सुमारे दोन वर्षे काम केले. गणेशने २०१० मध्ये नीळकंठेश्वर नाट्यसेवा संघामधून पदवी प्राप्त केली. गणेश कर्नाटक राज्यात रंगभूमी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम करतो आहे. सध्या म्हैसूर रंगायनमध्ये काम करत असलेल्या गणेशने कन्नड थिएटरला जवळपास १७ वर्षे समर्पित केली आहेत. त्याने कर्नाटकातील अनेक महाविद्यालयांमध्ये महाकाव्य रामायण दर्शनमचे पठण केले आहे. गणेश मंदार्थी हा कन्नड थिएटरमधील प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक व संगीतकार आहे.

ऋतुपर्णा बिश्बास यांनी सिलीगुडी थिएटर अकादमीमध्ये १३ व्या वर्षी तिचा रंगभूमीवरील प्रवास सुरू केला. पुढे ती कोलकत्याला गेली आणि रवींद्र भारती विद्यापीठात शिकत असताना हावडा येथील नाटक समूह ‘नाट्यप्रीतना’ मध्ये सामील झाली. पदवी घेतल्यानंतर, तिने आघाडीच्या ईटीव्ही बांग्ला टीव्ही मालिकांमध्ये काम केले आणि अभिनयात प्राविण्य मिळवून तिने नाटकात एमए पूर्ण केले. सुबोध पटनाईक यांच्या प्रेरणेने, ती आणि तिचे पती थिएटरला शाळा आणि गावांमध्ये घेऊन जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. इलादीदी आणि सावित्रीबाई फुले यांवर आधारित नाटकांमध्ये तिने प्रमुख भूमिका केल्या असून या नाटकांचे अनुक्रमे ५९० व १३५ शो झाले आहेत. ऋतुपर्णाने सुभेंदू भंडारी यांच्या दिग्दर्शनाखाली २० हून अधिक नाटकांमध्ये काम केले आहे. तिने आठ नाटके लिहिली आहेत (मुख्यतः मुलांसाठी) आणि चार दिग्दर्शित केली आहेत. कमीत कमी सोयीसुविधांमध्ये नाटक बसवून ते प्रत्येकासाठी आकर्षक बनवण्यात ऋतुपर्णा चा नावलौकिक आहे.

न्यूज अनकट पुणे प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा