पुण्यातील गणेश विसर्जन सोहळ्याच्या उत्साहावर चोरट्यांनी पाणी फेरले आहे. गर्दीचा फायदा घेत मोबाईल, सोनसाखळ्या आणि मंगळसूत्र चोरीला जाण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर आल्या आहेत. याप्रकरणी विश्रामबाग आणि फरासखाना पोलिस ठाण्यात अनेक गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
बेलबाग चौकात एका तरुणाचा तब्बल ६५ हजार रुपयांचा मोबाईल चोरीला गेला, तर टिळक चौकात ८९ हजारांचे मंगळसूत्र लंपास झाले. लक्ष्मी रस्ता आणि सेवासदन चौक येथे प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या सोनसाखळ्या चोरीला गेल्या. कोथरूडमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाची १५ हजारांची सोनसाखळी आणि शनिवारवाडा परिसरातून पिंपरी-चिंचवडच्या तरुणाची ४६ हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबवली. तसेच पिंपळे निलखमधील महिलेकडून ५० हजारांचे मंगळसूत्रही चोरीला गेले.
फक्त दागिनेच नव्हे, तर महागडे मोबाईल फोनही चोरट्यांच्या निशाण्यावर होते. एका तरुणाचे तब्बल १ लाख २५ हजारांचे दोन मोबाईल चोरीला गेल्याने पोलीस आणि नागरिक दोघेही सतर्क झाले आहेत. या घटना पाहता गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी अधिक सावध राहणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे