गणेशोत्सवात ढोल-ताशा पथकातील कार्यकर्त्यांना ‘संजीवनी’चा मंत्र

यंदाच्या गणेशोत्सवात पुणे शहराची शान असलेल्या ढोल-ताशा पथकांना केवळ वादनाचा नव्हे, तर ‘जीवन वाचवण्याचा’ मंत्रही मिळणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आणि आदर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संजीवनी’ नावाचा एक स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत ढोल-ताशा पथकातील सुमारे ४०० हून अधिक कार्यकर्त्यांना हृदयविकाराचा झटका, दम्याचा अटॅक, बेशुद्ध पडणे अशा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रथमोपचार देण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या उपक्रमाला मागील वर्षी घडलेल्या एका घटनेची प्रेरणा मिळाली आहे. कुमठेकर रस्त्यावरून निघालेल्या मिरवणुकीदरम्यान एका नागरिकाला हृदयविकाराचा झटका आल्यावर, स्वानंद पाटील नावाच्या ढोलवादकाने प्रसंगावधान राखून त्यांना त्वरित सीपीआर (CPR) देऊन त्यांचे प्राण वाचवले होते. या घटनेनंतर ढोल-ताशा वादकांमध्ये प्रथमोपचाराचे महत्त्व अधोरेखित झाले.

याच विचारातून ‘संजीवनी’ उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना जीवरक्षक उपचाराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षित विद्यार्थी आता ढोल-ताशा पथकातील कार्यकर्त्यांना सीपीआर, अस्थमा अटॅक, बेशुद्ध पडणे आणि फिट आल्यास तातडीने करायचे उपाय यांसारखे महत्त्वाचे प्रशिक्षण देतील.

हा उपक्रम गणेशोत्सवातील उत्साहाला सामाजिक जाणिवेची जोड देणारा आहे. यामुळे उत्सवाचा आनंद तर द्विगुणीत होईलच, पण त्याचबरोबर कोणत्याही अनपेक्षित घटनेला तोंड देण्यासाठी ढोल-ताशा पथक अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे पुणे शहरातील ढोल-ताशा पथके आता केवळ लय आणि तालानेच नव्हे, तर माणुसकी आणि मदतीच्या भावनेनेही ओळखली जातील.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सोनाली तांबे