खडकीत टोळक्याने वाहने फोडली, दहशत पसरविण्याचा प्रयत्न

13

पुणे, २० जुलै २०२३ : दहशत निर्माण करण्याच्या हेतूने नऊ ते दहा जणांच्या टोळक्याने खडकी-औंध रोड परिसरातील वीर भगतसिंग चौक, पहचाळवस्ती येथे वाहने फोडली. त्यामध्ये एक रिक्षा आणि तीन दुचाकींचे नुकसान झाले. टोळक्याने वस्तीतील नागरिकांच्या घराच्या दरवाजाच्या बाहेरुन कड्या लावून कोयता, लाकडी दांडके, रॉड हवेत उंचावून आम्ही येथील भाई आहोत असे म्हणत दहशत निर्माण केली.

या प्रकरणी ओंकार सोकाटे (वय २५) याने खडकी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे. आदित्य भारती शेंडगे, तेजस अर्जुन गायकवाड अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत, तर एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. आरोपी हे पूर्वी याच वस्तीत राहण्यास होते.

टोळक्याने दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने रस्त्याच्या कडेला पार्क केलेली दुचाकी आणि रिक्षावर दगड, लाकडी दांडके आणि कोयत्याने तोडफोड केली. त्यानंतर घराच्या दरवाजाच्या कड्या लावून राडा घालत दहशत निर्माण केली. तसेच आम्ही येथील भाई आहोत आमच्या नादाला कोणी लागल्यास एकेएकाला बघून घेऊ, अशी धमकी दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर