जालना १० जानेवारी २०२४ : जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील ढोकसाळ येथील शेतकऱ्यांच्या शेतातील गोदामातून शेतमालाची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. या घटनेची हकीकत अशी आहे की, शेतकरी रामेश्वर विठोबा खरात यांची भिलपुरी शिवारात शेतजमीन आहे. या शेतातील गोदामात त्यांनी योग्य भाव नसल्याने २० क्विंटल सोयाबीन, दोन क्विंटल बाजरी आणि शेजारील शेतकरी अर्जुन तुपे यांचे १६ क्विंटल सोयाबीन असा एकूण १ लाख ६८ हजार रुपयांचा शेतमाल साठवून ठेवला होता. चोरट्यांनी मागील महिन्यात ११ डिसेंबर रोजीच्या रात्री एका टेम्पोतून हा सर्व माल चोरून नेला.
या प्रकरणात बदनापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी तपासचक्रे तातडीने फिरविली होती. तपासामध्ये शेतमाल चोरी करणारे चोरटे हे परिसरातीलच गावातील असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस निरीक्षक भागवत यांनी सापळा रचून तीन चोरट्यांच्या मुस्क्या आवळल्या आहेत. पोलिसांनी सराईत चोरटे गणेश प्रल्हाद डाके (रा. मांजरगाव), कृष्णा अर्जुन लोखंडे (रा. बदनापूर) आणि लल्ल्या सांडू शेख (रा. ढोकसाळ) या तीन जणांच्या मुस्क्या आवळल्या आहेत.
चोरट्यांच्या ताब्यातून रोख ७५ हजार रुपये, चोरलेली २ क्विंटल बाजरी, ३ लाख ५० हजाराचे चोरी करण्यासाठी वापरलेले टेम्पो वाहन, ३ लाख ५० हजाराचे स्कॉर्पिओ वाहन, दीड लाख रुपये किमतीच्या तीन मोटारसायकल, असा ९ लाख २८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : विजय साळी