काश्मिर मधील लोकांसाठी गुजरातमध्ये बनावट ड्रायव्हिंग लायसन्स बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

जम्मू-काश्मीर १९ जून २०२३: गुजरातमध्ये लष्कराच्या बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने बनावट ड्रायव्हिंग लायसन्स बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय. या टोळीने जम्मू-काश्मीरमधील १००० लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली. लष्करी गुप्तचर संचालनालय पुणे शाखेच्या इनपुट आधारे, अहमदाबाद शहर गुन्हे शाखेने हा बनाव उघडकीस आणला.

ही टोळी आर्मीच्या कोट्यांतर्गत, बारामुल्ला आणि अनंतनाग जिल्ह्यांतील लोकांच्या नावाने ड्रायव्हिंग लायसन्स काढत असल्याचे उघडकीस आले. गांधीनगर आणि अहमदाबाद येथील आरटीओ कार्यालयातून असे सुमारे १००० परवाने जारी करण्यात आले आहेत. याप्रकरणी शहर गुन्हे शाखेने संतोष चौहान (४७) आणि धवल रावत (२३) या दोन आरटीओ एजंटला अटक केली आहे.

गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक एम.एस.त्रिवेदी यांनी शुक्रवारी फिर्याद दिली. या टोळीकडून २८४ ड्रायव्हिंग लायसन्स, ९७ सर्व्हिस मोटर ड्रायव्हिंग लायसन्स बुक, नऊ बनावट रबर स्टॅम्प, ३ लॅपटॉप, ४ मोबाईल फोन, ३७ ना हरकत प्रमाणपत्र, ९ सर्व्हिस सर्टिफिकेट, ५ कन्फर्मेशन लेटर, २७ स्पीड पोस्ट स्टिकर्स आणि एक पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे.

आरोपींनी बनावट स्टॅम्प बनवण्यासाठी, स्टॅम्प बनवण्याचे मशीन ऑनलाइन खरेदी केले, तसेच परवान्यासाठी सर्वांकडून ६००० ते ८००० रुपये दर आकारले जात होते. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे तसेच या प्रकरणी आणखी दोघांना अटक केली जाऊ शकते, असे त्रिवेदी यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा