जालना ७ ऑगस्ट २०२४ : जालन्यासह जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील जिओ आणि एअरटेल मोबाईल कंपनीच्या टॉवरमधील बॅटर्या चोरी करणार्या टोळीच्या मौजपुरी पोलिसांनी मुद्देमालासह मुसक्या आवळल्या आहेत. जालना शहरासह जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मागील काही दिवसांपासुन जिओ व एअरटेल कंपनीच्या दुरसंचार मोबाईल टॉवरमधील बॅटरी चोरीचे गुन्हे घडल्याने, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांना आप-आपले पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये प्रभावी रात्रगस्त पेट्रोलिंग करण्याबाबत आदेशीत केले होते.
मौजपुरी पोलिसांचे पथक रात्रगस्तीवर पेट्रोलिंग करत असतांना जालना ते मंठा हायवे रोडलगत, सोलगव्हाण पाटीजवळील धानोरा शेत शिवार अंतर्गत येणार्या शेतात असलेल्या एअरटेल कंपनीच्या मोबाईल टॉवर जवळ काही आरोपींच्या संशयास्पद हालचाल करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी सदर ठिकाणी टॉर्चचा प्रकाश त्यांच्या दिशेने मारला असता ते चोरटे त्यांच्या वाहनात बसुन तेथुन पळाले. पोलिसांना त्यांच्यावर संशय आल्याने त्यांनी पेट्रोलींग वाहन संशयीत वाहनाच्या दिशेने नेले असता संशयीतांनी गाडी जालन्याच्या दिशेने भरधाव वेगाने पळविली. यावेळी मौजपुरी पोलिसांच्या पथकाने वाहनाचा पाठलाग करुन उटवद येथील पेट्रोलपंपासमोर संशयित आरोपींची गाडी रोखुन त्यांना ताब्यात घेतले. गाडीची तपासणी केली असता सदर गाडीमध्ये बँटरी चोरी करीता लागणारे साहीत्य मिळुन आहे. त्यावरून पोलिसांनी अलीम उर्फ गुड्डु शेख खाजा, शेख हसन शेख मोहसीन रा. वडजी ता. रिसोड जि. वाशीम ह.मु. चिकलठाणा जि.छत्रपती संभाजीनगर, शुभम अशोक फतरे, राहुल उर्फ सुनील संजय मेहेर रा.चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर यांना जेरबंद केलंय.
या आरोपींच्या ताब्यातील ईरटीगा वाहन क्र. (एम.एच ०४ जि.डी. ३५२६) सह पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्यांनी जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये विविध पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोबाईल टॉवरवरील बॅटर्या चोरीचे गुन्हे केल्याच कबूल केलंय. याप्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईत पोलिसांच्या पथकाने १० लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त केलाय.
न्युज अनकट प्रतिनीधी : विजय साळी










































