सलमान खानला ठार मारण्याची धमकी देणार्‍या गँगस्टर बिश्नोईला बनावट एन्काऊंटरची भीती

हरियाणा, २६ ऑगस्ट २०२०: चित्रपट अभिनेता सलमान खानला मारण्याची धमकी देऊन चर्चेत आलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला हरियाणा पोलिसांकडून बनावट चकमकीची भीती वाटत आहे. त्यानी यासंदर्भात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. संरक्षणाची मागणी करीत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यानी म्हटले आहे की, २१ जुलै रोजी हरियाणा पोलिसांनी त्याच्या विरोधात सिरसा येथील डबवाली येथे गुन्हा दाखल केला होता.

लॉरेन्स बिश्नोई सध्या राजस्थानच्या भरतपूर येथील सेंट्रल जेल सेव्हरमध्ये शिक्षा भोगत आहे. हरियाणा पोलिस त्याला प्रोडक्शन वॉरंटवर नेण्यासाठी विचार करत आहेत. कानपूरच्या विकास दुबे सारख्या गुन्हेगाराचा ज्याप्रमाणे एन्काउंटर झाला त्याप्रमाणे एन्काऊंटर होऊ नये अशी भीती त्याला आहे. अशा परिस्थितीत त्याला योग्य ती सुरक्षा देऊन हात पाय बांधून त्याला हरियाणा येथे आणले पाहिजे जेणेकरून पळण्याच्या आरोपाखाली बनावट एन्काऊंटर मध्ये त्याला ठार मारले जाऊ नये. यापूर्वीही लॉरेन्स बिश्नोई याने चंदीगड आणि सिरसा न्यायालयात अशीच याचिका दाखल केली होती. तेथे दाखल असलेल्या खटल्यांमध्ये सुरक्षा आणि बनावट चकमकीचा संशय निर्माण झाला होता.

वर्ष २०१८ मध्ये चित्रपट अभिनेता सलमान खानला जोधपूर मध्ये बिश्नोई याने जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यावेळी त्याला जोधपूर कोर्टात हजर करण्यात आले. पोलिसांच्या ताब्यातच त्याने ही धमकी माध्यमांशी संवाद साधताना दिली. राजस्थानसह अनेक राज्यात बेकायदा वसुली, खंडणी, खून आणि गोळीबार अशी अनेक प्रकरणे लॉरेन्सवर आहेत.

ज्या दिवशी लॉरेन्स बिश्नोई हजर झाला त्याच दिवशी आसारामला न्यायालयात हजर केले जाणार होते. यामुळे मीडिया कर्मचारी तिथे पोहोचले होते. जोधपूरमध्येच सलमानची हत्या करेन असे लॉरन्सने माध्यमांमध्ये सांगितले होते. १९९८ मध्ये ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जोधपूरच्या कंकणी गावात सलमानवर दोन हरणांची शिकार केल्याचा आरोप होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा