नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2021: देशाची राजधानी दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात टोळीयुद्ध झाले आहे. मोस्ट वॉन्टेड गुंड जितेंद्र उर्फ गोगीची शुक्रवारी दुपारी येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाच्या आवारात गोळीबार झाला आणि हल्लेखोरही ठार झाले.
या गोळीबारात 3 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झालीय. त्यापैकी एक जितेंद्र आहे, तर दोन हल्लेखोर जितेंद्रवर हल्ला करण्यासाठी आले होते. स्पेशल सेलच्या जवानांनी दोन्ही हल्लेखोरांना ठार केलंय. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास संयुक्त आयुक्त उत्तर करणार असून तपासाचा अहवाल दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांना सादर केला जाईल. याशिवाय फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली आणि तपास सुरू केला.
तिहार जेलमध्ये बंद असलेल्या जितेंद्र उर्फ गोगीला शुक्रवारी न्यायालयात आणण्यात आलं. दरम्यान, रोहिणी न्यायालयाच्या आवारात गुंडा मध्ये गोळीबार झाला. रोहिणी न्यायालयाच्या आवारात गोळीबार झाल्यामुळं हा परिसर सील करण्यात आलाय. यादरम्यान चेंगराचेंगरीत एक महिला वकीलही जखमी झाली.
हल्लेखोर वकिलांच्या वेशात आले
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन हल्लेखोर वकिलांच्या रूपात न्यायालय परिसरात घुसले होते ज्यांनी गुंड जितेंद्रवर गोळीबार केला होता. स्पेशल सेलच्या टीमनं जितेंद्रला कोर्ट रूममध्ये नेलं, जिथं ही घटना घडली. जितेंद्रची हत्या दिल्लीच्या टिल्लू टोळीनं केली होती. ठार झालेल्या दोन हल्लेखोरांपैकी एक राहुल आहे, ज्यावर 50 हजारांचे बक्षीस आहे. तर आणखी एक गुंड आहे.
जितेंद्रला दोन वर्षांपूर्वी पकडण्यात आलं होतं
जितेंद्रला दोन वर्षांपूर्वी गुरुग्राममधून स्पेशल सेलनं अटक केली होती. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या मते, जितेंद्र गोगीनं गुन्हेगारीच्या माध्यमातून भरपूर संपत्ती कमावली होती. जितेंद्र गोगी यांच्या नेटवर्कमध्ये 50 हून अधिक लोक आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे