पिंपरी, ७ जानेवारी २०२३ : बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी गांजा जवळ बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एकाला अटक केली. पिंपरीतील वल्लभनगर येथे केलेल्या या कारवाईत दीड लाखाचा गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी लखन ऊर्फ गोविंद तात्या काळे (वय २८, रा. मु.पो. मुरूड, जि, लातूर) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर सुनील बाबू काळे (रा. मौजे कळंब, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याविषयी अधिक माहिती अशी, की आरोपी लखन याच्याकडे गांजा असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून लखन याला वल्लभनगर बसथांबा येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक लाख ५६ हजार २५० रुपये किमतीचा सहा किलो २५ ग्रॅम गांजा सापडला. विक्री करण्यासाठी त्याने गांजा जवळ बाळगला. हा गांजा सुनील यांच्याकडून आणला असल्याचे लखन याने सांगितले. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील