मुंबई, दि. ११ जुलै २०२०: सर्वत्र कोविड -१९ चे संकट पाहण्यास मिळत आहे, मात्र या संकटाचे मोचान करण्यासाठी लवकरच विघ्नहर्ता येत आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सव जोमात साजरा केला जात असला तरी यावेळेस मात्र कोविड -१९ चा प्रभाव पाहता शासनाने काही नियम व अटी घालून दिले आहेत. याआधी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व गणेश मंडळातील अध्यक्ष सोबत चर्चा केली होती त्यानुसार सर्व गणेश मंडळांनी हे देखील मान्य केले होते की, या वेळेचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येईल. आता यानंतर आज सरकारने गणेश मुर्ती विषयी नवीन अध्यादेश काढले आहेत. यामध्ये गणपतीची मूर्ती दोन फुटांपेक्षा जास्त उंच नसावी अशी अट घालण्यात आली आहे.
काढलेल्या नवीन अध्यादेशानुसार विसर्जन ठिकाणी गर्दी होऊन कोविड -१९ चा प्रादुर्भाव आणखी वाढू नये, म्हणून गणेश विसर्जन करण्याआधी जी आरती केली जाते ती घरातूनच करून जावे असे सांगण्यात आले आहे. करोनाच्या पार्श्वभूमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यातील गणेशोत्सव मंडळासोबत बैठका घेतल्या होत्या. त्यात झालेल्या चर्चेनुसार राज्य सरकारनं उत्सवासाठी काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीच्या उंचीवर चार फुटांचे तर, घरगुती मूर्तीच्या उंचीवर दोन फुटांचे बंधन असेल.
सरकारच्या मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे:
• सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिका व स्थानिक प्रशासनाच्या धोरणानुसार आवश्यक परवानग्या घ्यावा लागतील उत्सवाचे मंडप हे न्यायालयाचे आदेश आणि प्रशासनाच्या धोरणाशी सुसंगत असावे.
• सजावट करताना भपकेबाजी नसावी.
• शक्यतो घरातील धातू/संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. मूर्ती पर्यावरणपूरक असल्यास विसर्जन शक्यतो तो घरीच करावे. ते शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम तलावात विसर्जन करावे.
• गणेशमूर्तींचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास माघी गणेशोत्सव विसर्जनावेळी किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यात पुढील विसर्जनावेळी करता येणे शक्य आहे. जेणेकरून विसर्जनाची गर्दी टाळता येईल व सर्वांनाच सुरक्षित राहता येईल.
• सार्वजनिक उत्सवासाठी वर्गणी/देणगी स्वेच्छेने मिळत असल्यास घ्यावी.
• जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही हे पाहावे. जाहिराती आरोग्यविषयक किंवा सामाजिक संदेश देणाऱ्या असतील हे पाहावे.
न्यूज अनकट प्रतिनिधी