बारामतीतील गॅसदाहिनी कार्यान्वित… 

बारामती, २९ सप्टेंबर २०२०: बारामती शहरात गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेली गॅसदाहिनी शहरातील अमरधाम स्मशानभूमीमध्ये आजपासून अखेर कार्यान्वित झाली. आज या दाहिनीत प्रथमच एका कोरोना रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पर्यावरणपूरक व कमी वेळेत अंत्यसंस्कार हे गॅसदाहिनीचे वैशिष्टय आहे. पहिल्या टप्प्यात फक्त कोरोनाग्रस्त मृतदेहांवरच या गॅसदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी सांगितले.

बारामतीत आरोग्याच्या सुविधा अधिक असल्याने बारामतीसह इतर तालुके व जिल्ह्यातूनही रुग्ण उपचारासाठी बारामतीत आले होते. कोरोनामुळे एकट्या बारामतीत आजपर्यंत १७४ मृत्यू झाले असून यातील बारामतीतील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा आकडा ७८ इतका आहे. या सर्व मृतदेहांवर बारामती नगरपालिकेच्या कोरोना योध्द्यांनीच अंत्यसंस्कार केले. एकेका दिवशी सात ते आठ अंत्यसंस्कार करण्याचीही वेळ त्यांच्यावर आली होती.

यामध्ये या कर्मचा-यांना होणारा मनस्ताप, वाया जाणारा वेळ, साधनसामग्रीची जमवाजमव तसेच संपूर्ण अंत्यविधी होईपर्यंत मृतदेहाजवळ थांबून राहावे लागणे यासारख्या प्रकारांनी कर्मचारीही वैफल्यग्रस्त झाले होते. ही बाब विचारात घेत मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी गॅसदाहिनी कार्यान्वित करण्यास चालना दिली. काही दिवसातच हे काम पूर्ण झाल्यानंतर आज प्रत्यक्ष पहिल्यांदा या गॅसदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार  झाले.

उपयुक्त गॅसदाहिनी

चार मिनीटांत प्रज्वलित होणाऱ्या या गॅसदाहिनीत अवघ्या तीन मिनिटांत मृतदेहावर अंतसंस्कार केले जातात. २४ सिलिंडर्सच्या मदतीने ही गॅसदाहिनी प्रज्वलित केली जाते. एका अंत्यसंस्कारासाठी दोन सिलिंडर्सची गरज भासते. एकदा २४ सिलिंडर्स लावल्यानंतर साधारणपणे २० मृतदेहांवर अंत्यसंस्कार होऊ शकतील. साधारणपणे एक तासात एका मृतदेहावर अंत्यसंस्कार होऊ शकतात.

पर्यावरणपूरक गॅसदाहिनी

बारामतीच्या गॅसदाहिनीचे काम गेल्या काही महिन्यांपासून रखडले होते. कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी गॅसदाहिनीची अत्यंत गरज होती. मध्यंतरीच्या पूरामध्ये दाहिनीचे बरेच नुकसान झाले होते. मात्र प्रशासनाने पाठपुरावा करुन आता ही दाहिनी कार्यान्वित केली आहे. –  किरणराज यादव, मुख्याधिकारी, बा.न.प.

काळाची गरज होती

बारामतीत गॅसदाहिनी सुरु होणे ही काळाची गरज होती. पावसाळ्यात अनेकदा सरपणाचा प्रश्न निर्माण होत होता. गॅसदाहिनीमुळे पर्यावरणपूरकता जपली जाईल, याचा फायदा सर्वांनाच होईल. – सचिन सातव, गटनेते, बा.न.प.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा