गौतम अदानी श्रीलंकेत या क्षेत्रात करणार प्रवेश, अक्षय ऊर्जेवर करणार लक्ष केंद्रित

नवी दिल्ली, 27 ऑक्टोंबर 2021: अदानी समूह आता श्रीलंकेतील पायाभूत सुविधांच्या विकासात मोठी भूमिका बजावण्याचा प्रयत्न करत आहे.  हा समूह केवळ कोलंबो बंदराच्या वेस्टर्न कंटेनर टर्मिनलचा विकास करत नाही, तर इतर पायाभूत सुविधांच्या भागीदारीचाही शोध घेईल.  अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ही माहिती दिली आहे.
अदानी सध्या श्रीलंकेत असून त्यांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांची भेट घेतली.  अदानी श्रीलंकेला वैयक्तिक भेटीवर आल्याचे सांगितले जाते परंतु त्यांचा समूह श्रीलंकेत मोठ्या गुंतवणुकीच्या संधी शोधत आहे.  अदानी यांच्यासोबत 10 सदस्यीय शिष्टमंडळ श्रीलंकेला जात आहे.
दोन आठवड्यांपूर्वी केला होता करार
दोन आठवड्यांपूर्वी गौतम अदानी यांच्या कंपनीने श्रीलंका सरकारच्या मालकीच्या  बंदर प्राधिकरणाशी (SLPA) सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या कोलंबो बंदरावर वेस्टर्न कंटेनर टर्मिनल विकसित करण्यासाठी आणि चालवण्यासाठी करार केला होता.  70कोटी डॉलर बील्ड-ऑपरेट-ट्रान्सफर ही श्रीलंकेच्या बंदर क्षेत्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी विदेशी गुंतवणूक आहे.
पवन ऊर्जा क्षेत्रातही मोठी गुंतवणूक
अदानी समूह श्रीलंकेच्या अक्षय ऊर्जा क्षेत्रातही गुंतवणुकीच्या संधी शोधत आहे. श्रीलंका सरकारच्या सिलोन इलेक्ट्रिसिटी बोर्ड (CEB) चे वरिष्ठ अधिकारी म्हणतात की पवन ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक केली जाऊ शकते.  अदानी समूहाने सोमवारी श्रीलंकेतील पवन आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी शोधल्या, असे सीईबीच्या उपाध्यक्षा नलिंदा इलांगाकून यांनी सांगितले.  अदानी समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी ईशान्येकडील जिल्ह्यातील मन्नारला भेट देऊन तेथील पवनऊर्जा फार्मची पाहणी केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा