मुंबई १८ जून २०२३: अदानी एंटरप्रायझेस लवकरच ट्रेन तिकिटांची ऑनलाइन विक्री करणार आहे. इतकंच नाही तर ऑनलाइन ट्रेन तिकीट बुकिंग व्यवसायात ही कंपनी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या मक्तेदारीला (मक्तेदारी) आव्हान देणार आहे.
अदानी यांचा अदानी समूह आता रेल्वे क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहे. अदानी एंटरप्रायझेसने शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराला या बाबतीत माहिती दिली. कंपनीने असेही सांगितले आहे की या व्यवसाय योजनेसाठी ती स्टार्क एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड (SEPL) मध्ये १००% चा स्टेक घेणार आहे. स्टार्क एंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड ‘ट्रेनमॅन’ म्हणूनही ओळखले जाते. ट्रेनमॅन हा एक अधिकृत ऑनलाइन ट्रेन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म आहे जो गुरुग्राम स्थित स्टार्क एंटरप्रायझेसद्वारे चालवला जातो. या प्लॅटफॉर्मवरून रेल्वे तिकीट बुक करण्याव्यतिरिक्त, तुम्ही पीएनआर स्थिती, कोचची स्थिती, थेट ट्रेनची स्थिती आणि सीट उपलब्धता यासारखी माहिती मिळवू शकता.
अदानी डिजिटल लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड (ADL) ने स्टार्क एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेडमधील १००% स्टेकच्या प्रस्तावित अधिग्रहणा संदर्भात शेअर खरेदी करार (SPA) वर स्वाक्षरी केली. मात्र, दोन्ही कंपन्यांमध्ये हा करार किती झाला आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. अदानी डिजिटल लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड ही अदानी एंटरप्रायझेसची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे.
हिंडनबर्ग अहवालामुळे फेब्रुवारी २०२३ च्या शेवटी शेवटी, अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स प्रचंड विक्रीनंतर NSE वर सुमारे ₹११९५ च्या नीचांकी पातळीवर पोहोचले होते. आता गेल्या आठवड्यात शुक्रवारी अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरच्या किमतीने सुमारे ₹२५०५ चा टप्पा ओलांडला आहे. चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत, कंपनीच्या स्टॉकमध्ये १००% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. तर दुसरीकडे, नोव्हेंबर २०२२ मध्ये सुरू झाल्यापासून IRCTC शेअरची किंमत बेस बिल्डिंग मोडमध्ये राहतेय. IRCTC स्टॉकने गेल्या एका महिन्यात सुमारे ९% परतावा दिला आहे. अलीकडेच IRCTC शेअरने प्रति शेअर ₹६४५ वर ब्रेकआउट दिला आहे आणि या शुक्रवारी त्याचा शेअर NSE वर ₹६६६ वर बंद झाला.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.