‘गर्लफ्रेंड नाही, पण गर्लफ्रेंडपेक्षा कमीही नाही!

Gen Z Relationship Trends

Gen Z Relationship Trends: Gen Z अर्थात आजच्या तरुण पिढीच्या रिलेशनशिप स्टेटसने अनेकांना कोड्यात पाडले आहे. प्रेम, नातेसंबंध या पारंपरिक संकल्पनांना फाटा देत, ही पिढी नव्या नात्यांच्या परिभाषा घडवत आहे. जिथे पूर्वी “नाते” हा एकच शब्द होता, तिथे आता “क्रश”, “सिच्युएशनशिप”, “लव्ह बेनिफिट” आणि “फ्रेंड्स विथ बेनिफिट्स” यांसारख्या अनेक शब्दांनी जागा घेतली आहे.

Gen Z च्या मते, रिलेशनशिपमध्ये बांधून राहणे त्यांना “बोअरिंग” वाटते. “प्रेम खरंच अस्तित्वात आहे का?”, यावरही त्यांचा विश्वास नाही. त्यांना त्यांच्या तरुणपणात “फन” हवे आहे आणि म्हणून ते अशा रिलेशनशिप्समध्ये उत्सुकता दाखवतात, जिथे कोणतीही बंधने नाहीत. एका तरुणाच्या मते, त्यांना गर्लफ्रेंड नको आहे, पण अशी एक मैत्रीण हवी आहे जी गर्लफ्रेंडपेक्षा कमी नसेल. हेच मुलींबाबतही खरे आहे; बॉयफ्रेंड नको, पण बॉयफ्रेंडसारखा मित्र हवा!
या नात्यांमध्ये, मुलगा किंवा मुलगी पूर्णपणे मोकळे असतात.

प्रेमसंबंध असले तरी ते “ओपन” असतात. एक मुलगी तिच्या प्रियकराव्यतिरिक्त इतर मुलांशी मैत्री ठेवू शकते आणि मुलांबाबतही हेच लागू होते. Gen Z च्या मते, ही रिलेशनशिप दोघांसाठी “परफेक्ट” आहे, कारण त्यात नात्याचा ताण नसतो.

पण या नाण्याला दुसरी बाजूही आहे. “हम दिल दे चुके सनम पर आपसे कोई उम्मीद नहीं,” अशी काही प्रेमात पडलेल्या तरुणांची व्यथा आहे. एकतर्फी प्रेम हे भयानक असते, कारण त्यात स्वप्ने रंगवली जातात, पण ती कधी खरी होतील याची खात्री नसते. “ना तू माझा, ना मी तुझी” याला Gen Z “सिच्युएशनशिप” म्हणतात. प्रेमाला होकारही नसतो आणि नकारही नाही, फक्त एक अनिश्चितता असते.

कॉलेजमध्ये तर “लव्ह बेनिफिट” ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर दिसते. नोट्स काढून देणे, असाइनमेंटमध्ये मदत करणे, हे सर्व ‘कॉलेज लव्ह विथ बेनिफिट’ मध्ये मोडते. Gen Z च्या नात्यांची ही नवी दुनिया जुन्या पिढीला कदाचित गोंधळात टाकू शकते, पण आजच्या तरुणाईसाठी हेच त्यांचे “कूल” जग आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे