आता घरबसल्या मिळवा लर्निंग लायसन, अनिल परब यांची माहिती, नवीन योजना जाहीर

मुंबई, १५ जून २०२१: ड्रायव्हिंग लायसन शिवाय गाडी चालवणे म्हणजे कायदेशीर कारवाईस सामोरं जाण्यास आमंत्रणच आहे. महत्त्वाचं म्हणजे ड्रायव्हिंग लायसन काढणे देखील तितकच किचकट मानलं जातं. सरकारी कामकाज म्हणलं की सरकारी कार्यालयांमध्ये चकरा मारणे, दलालाला भेटणं आणि यानंतर काम झालं तर बरं. पण आता ही सर्व किचकट प्रक्रिया सोपी झाली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने Learner’s License साठीच्या प्रक्रियेतही काही बदल केले आहेत. यामध्ये आता ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुम्हाला RTO कार्यालयात जाण्याची गरज नाही.

नागरिकांची या सर्व प्रक्रियेमध्ये होणारी धावपळ पाहता सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देत ही प्रक्रिया ऑनलाईन केल्यामुळं जनतेचा त्रास कमी झाला आहे. तुम्हाला लर्निंग लायसन्सची सुविधा आता घरबसल्या मिळणार आहे. आजच या योजनेचं उद्घाटन करण्यात आलं, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिलीय. त्यामुळे आता लर्निंग लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. तुमचा आधार क्रमांक मोबाईल नंबरशी लिंक करुन, तपशील देऊन तुम्हाला लर्निंग लायसन्स मिळवता येणार आहे.

या योजनेंतर्गत मंत्रालय टेस्टसाठी ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सला मान्यता देणार जेनेकरून ते त्याची अंमलबजावणी करतील. यासाठीदेखील मंत्रालयाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पण खास सेवेसाठी ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सला सरकारने दिलेल्या नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे. या योजनेबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती देणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

खर्चात बचत, कामाचा ताणही कमी

राज्यात दरवर्षी सुमारे १५ लाखापेक्षा जास्त शिकाऊ परवाने देण्यात येतात तसेच २० लाखाहून अधिक नवीन वाहनांची नोंदणी होते. या कामी नागरिकांचा अंदाजे १०० कोटी रुपयांचा खर्च होतो. आता या सेवा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून दिल्याने खर्चात बचत होऊन नागरिकांचा वेळ व श्रमही वाचणार आहे. तसेच हे काम करणाऱ्या अंदाजे २०० अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत झाल्याने विभागाच्या कामाची दर्जोन्नती करणेही यातून शक्य होईल.

परिवहन सेवेतील हे क्रांतीकारी पाऊल – अनिल परब

जनहिताच्या दोन ऑनलाईन सेवांचे लोकार्पण हे या क्षेत्रातील क्रांतीकारी पाऊल असल्याचे सांगतांना परिवहन मंत्री अनिल परब यावेळी म्हणाले की, आजच्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात गर्दी टाळून विभागाचे नियमित कामकाज सुरु ठेवण्यासाठीही त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. विभागामार्फत आतापर्यंत जनहिताच्या ८५ सेवा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून दिल्याची माहिती श्री.परब यांनी यावेळी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा