गाझियाबाद धर्मांतर प्रकरणाचा मास्टरमाईंड शाहनवाज उर्फ बड्डो याला महाराष्ट्रातून अटक, आज उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात!

मुंबई, १२ जून २०२३: गेमिंग अॅप वापरण्याच्या बहाण्याने तरुणांचे धर्मांतर करणारा आरोपी शाहनवाज उर्फ बड्डो याला महाराष्ट्रातून अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस आज त्याला न्यायालयात हजर करणार आहेत. त्याचवेळी, यूपी पोलिस आज कोर्टाकडे ट्रान्झिट रिमांडची मागणी करणार आहेत. न्यायालयाने आदेश दिल्यास शाहनवाजला आज गाझियाबाद पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल. तत्पूर्वी पोलिसांनी आरोपीला त्याची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेले.

उत्तर प्रदेशचे पोलीस सतत त्याचे मोबाईल लोकेशन ट्रेस करत होते. दरम्यान, तो मुंबईतील वरळी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, पोलिस तेथे पोहोचताच तो वरळीतून पळून गेला. त्यानंतर तो रायगडमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी शाहनवाजला येथील एका लॉजमधून अटक केली. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बड्डो वारंवार त्याचे मोबाइल सिम आणि लोकेशन बदलत होता.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहनवाज पळून गेल्यावर पोलिसांनी त्याची आई आणि भावाला ताब्यात घेतले. मात्र, आईकडून बड्डोबाबत कोणतीही विशेष माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. मात्र, भावाने बड्डोबद्दल काही महत्त्वाची माहिती पोलिसांना दिली, ज्याच्या आधारे त्याची अटक शक्य झाली. यूपी पोलिसांनी ३० मे रोजी बड्डोविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा