घोडेमुख जत्रा… दक्षिण कोकणातील ३६० चाळ्यांचा अधिपती!

कुडाळ (जि. सिंधुदुर्ग), २८ नोव्हेंबर २०२२ : सिंधुदुर्गातील ३६० चाळ्यांचा अधिपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड-पेंडूर गावच्या श्रीदेव घोडेमुख देवाचा वार्षिक कोंबड्यांचा जत्रोत्सव आज थाटात झाला. यावेळी सकाळपासून भक्तगण यांनी उंच डोंगरमाथ्यावर वसलेल्या श्रीदेव घोडेमुख देवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. असंख्य भक्तगणांनी आपले नवस फेडले.

सायंकाळी महत्वाचा क्षण म्हणजे कोंबे देऊन नवस फेडण्याच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होती. मातोंड देवस्थानकडून वाजत-गाजत तरंग काठीसह देव श्रीदेव घोडेमुख देवस्थानाकडे देव आले. त्यानंतर पारंपरिक धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर कोंबडे मानवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. कर्नाटक, गोवा; तसेच महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांतूनही अनेक भक्तगणांनी श्रीदेव घोडेमुखाचं दर्शन घेतलं.  

मातोंड-पेंडूर या दोन गावांचं श्रीदेव घोडेमुख देवस्थान हे जागृत देवस्थान असून, प्रत्येक भक्ताच्या नवसाला पावणारे देवस्थान अशी ख्याती आहे. या देवाच्या वार्षिक जत्रोत्सवाला कोंबडा देऊन नवस फेडला जातो; तसेच ज्या भक्ताला शारीरिक दुखापत असते ते मातीचे अवयव अर्पण करून आपला नवस या जत्रा जत्रोत्सवाला फेडतात. श्रीदेव घोडेमुख देवस्थान शिवशंकरस्वरूपी देवस्थान असून, येथील ३६० चाळ्यांचा अधिपती आहे. 

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : रोहन नाईक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा