घोडनदीपात्रात वाळू उपसणाऱ्या २१ बोटींना जलसमाधी

पुणे : शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांनी घोडनदी पात्रात वाळु उपसा करण्याऱ्या २१ बोटींना जलसमाधी देऊन दबंग कारवाई केली आहे. त्यामुळे वाळू तस्कारांचे धाबे दणाणले असुन,त्यांच्या सातबारा उताऱ्यावर बोजा चढणार का ? या कडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
या पुर्वीचे तहसीलदार गुरु बिराजदार यांची अवघ्या काही महीन्यामधेच तस्करांवर कारवाई केली म्हणुन बदली झाली . त्यानंतर लैला शेख याठिकाणी रुजू झाल्या. वाळू तस्करांनी मोठ्या थाटात घोडनदी पात्रामधे निवडणुकीची धामधुम लक्षात घेऊन त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाळु उपशाला सुरवात केली होती. त्यामधे दिवसा ढवळ्या लिलाव असल्यासारखे बोटी लाऊन उपसा सुरू होता.
निवडणुकीच्या कामाचा ताण, खाकीचा असलेला आर्शिवाद यामुळे कारवाई करण्यास अडथळे येत होते .
तहसीलदार यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी तस्करांचे हेर तहसील कार्यालय , तहसीलदार यांचे निवासस्थान परीसरात ठाण मांडुन असतात. त्यामुळे कारवाई करण्यासाठी निघालेल्याची माहीती लगेच तस्करांना समजत होती.
पोलिस निरीक्षक नारायण सारगकर यांच्या बदलीनंतर खाकीचा वचक कमी झाला आहे. सध्या तस्करांना लक्ष्मी कृपेने खाकी आर्शिवाद देत असल्यांची चर्चा जनतेमध्ये आहे .
तहसीलदार शेख यांनी नगर पोलिसांची मदत घेऊन संयुक्त कारवाई करीत २१ बोटींना जलसमाधी दिली. त्यामुळे सुमारे एक कोटीचे बोटीचे नुकसान केले आहे.
शिरूर तालुक्यात प्रथमचं एवढ्या मोठया प्रमाणात कारवाई झाल्याने जनतेतून त्यांचे कौतुक होत आहे.
तालुक्यांच्या बेट भागात व कवठे येमाई ,संविदने ,कान्हुर मेसाई ,मलठण आमदाबाद, ढोक सांगवी ,अण्णापुर ,वडनेर , पिंपरखेड परीसरात तस्कर सक्रीय झाले असुन वाळुच्या ट्रक रस्त्यांचे नुकसान करीत आहेत .
या पुर्वीचे तहसीलदार रणजीत भोसले व गुरु बिराजदार यांनी अनेक मोठ्या कारवाया करीत कोट्यावधी रुपयांची दंडाच्या नोटीसा बजावल्या होत्या. मात्र पुढे दंड वसुल झाला नसुन त्यांच्यावर कधी कारवाई होणार की प्रकरण मिटणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे .

कोट…
“वाळु उपसा करून शासनाची चोरी करणाऱ्या सराईत वाळु तस्करांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येईल.”
-लैला शेख, तहसीलदार, शिरूर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा