पनवेल, दि. १८ जुलै २०२०: संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी लढत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. त्यानुसारच पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील कोरोना संशयितांना किंवा हाय रिस्क लोकांना क्वारंटाईनची व्यवस्था कोणगाव येथील इंडिया बुल्स येथे करण्यात आली आहे. या इमारतीतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पनवेलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका २५ वर्षीय तरुणीवर क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्याच एका २५ वर्षीय युवकाने लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री घडली आहे.
पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी सांगितले की क्वारंटाईन सेंटर मध्येच कोरोना संशयित म्हणून दाखल झालेल्या एका तरुणीचा एका विकृत मनोवृत्तीच्या तरुणाने विचित्र पद्धतीने विनयभंग केला आहे. पीडित मुलगी आणि मुलगा एकाच परिसरात राहत असून मुलाने तिचा विनयभंग केला. त्या तरूणीच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य त्या तरूणाने केल्याचा आरोप पिडितेने केला आहे. पोलिसांनी याबाबत तत्काळ कारवाई करत भा. दं. वि. कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अशा विकृत व संतापजनक घटना या महामारीच्या काळात देखील घडत आहेत.ज्या क्वांरनटाईन सेंटरमधे हि घटना घडली तिथे सध्या भितीचे वातावरण सध्या आहे. तर प्रशासनाने देखील अशा घटनांचे चिंतन करणे गरजेचे आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी