पुणे, ता. १० जानेवारी २०२३ : शिवणे येथील नवभारत विद्यालयात मंगळवारी (ता. तीन) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक मा. श्री. आनंद पिंगळे आणि पर्यवेक्षिका सौ. मीनाक्षी मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बालिका दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. ज्ञानदेव कुंभार यांनी अध्यक्षस्थान भूषविले. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. अरुण बारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अतिशय सुंदर व उत्साहवर्धक वातावरणात कार्यक्रम पार पडला.


सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून; तसेच दीपप्रज्वलनाने झाली. इयत्ता दुसरी ते सातवीच्या प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांची भाषणे झाली. इयत्ता सातवी ‘अ’मधील तनुजा माने या विद्यार्थिनीने ‘मी सावित्रीबाई फुले बोलतेय’ ही एकांकिका खूप छान सादर केली; तसेच उपस्थित सर्व शिक्षक व विद्यार्थिनींना सौ. संगीता सावंत यांच्यातर्फे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. रांगोळी व फलकलेखन सौ. शीतल आगम यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सौ. सुवर्णा जागडे यांनी आभार मानले.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील