वॉशिंग्टन, ४ डिसेंबर २०२०: टाईम मासिकानं पहिल्यांदाच लहान मुलांना ‘किड ऑफ द इयर’ ही पदवी दिली असून भारतीय-अमेरिकन नागरिक गीतांजली राव यांना सन २०२० साठी किड ऑफ द इयर म्हणून निवडलं गेलं. उदयोन्मुख वैज्ञानिक आणि अन्वेषक म्हणून ओळखल्या जाणार्या पंधरा वर्षीय गीतांजलीनं सुमारे पाच हजार मुलांना मागे टाकत हे पदक मिळवलं आहे.
सायबर बुलिंगला सामोरे जाण्यासाठी अॅप तयार करण्यापासून ते गीतांजली आता पाण्याचे शुद्धीकरण तपासण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर काम करत आहेत. अॅकॅडमी अवॉर्ड विजेती अँजेलिना जोलीनं झूम फॉर टाईमवर गीतांजलीची मुलाखत घेतली. हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जोली ही संयुक्त राष्ट्र शरणार्थी उच्चायोगाची विशेष दूतही आहे.
सायबर बुलिंग रोखण्यासाठी केलेल्या शोधाबद्दल बोलताना गीतांजली म्हणाली की, ही एक प्रकारची सेवा आहे, ज्याचं नाव काइंडली (Kindly) ठेवलं आहे. हे एक अॅप आणि क्रोम एक्सटेंशन आहे जे सायबर बुलिंग सुरू होताच त्याला शोधु शकतं. हे करताना, आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नोलॉजीची मदत घेतली जाते. ती म्हणाली की, माझा हेतू फक्त माझं स्वतःचं उपकरण बनवून जगाच्या समस्या सोडवणं इतकंच मर्यादित नव्हतं, परंतु आता मला इतरांनाही तसं करण्यास प्रेरित करावस वाटतं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे