लोणी काळभोर २८ जुलै २०२० : मराठा आंदोलनामध्ये बलिदान दिलेल्या ४२ कुटुंबांच्या पूर्ण विकासाचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर आंदोलन करू असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने पुण्यात दिला आहे.
पुण्यात पत्रकार परिषदेत मराठा क्रांती ठोक मोर्चाने हा इशारा दिला आहे. तसेच या मृत कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाखांची मदत व एका सदस्याला सरकारी नोकरी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.
यावेळी पत्रकार परिषदेत मराठा मोर्चांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, मराठा आंदोलनात मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख आणि कुटुंबातील प्रत्येकी एकाला नोकरीचं आश्वासन दिले होते. मात्र, या अश्वासनाची अजूनही पूर्तता झालेली नाही. तसेच २०१८ मध्ये केलेल्या आंदोलनात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप त्यावर काहीही चर्चा झाली नाही.
मात्र आता सरकार सोबत कोणतीही चर्चा करणार नसून ४२ जणांना नोकरीत घ्यावं, अशी मागणी मराठा मोर्चाकडून करण्यात आली आहे. अन्यथा ९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थानी आंदोलनाला बसणार असल्याचे मराठा मोर्चाच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे