सट्टेबाजीला अधिकृत मान्यता दिल्यास अर्थव्यवस्थेला हातभार लागेल: अनुराग ठाकूर

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर २०२०: सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता मिळावी असं मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केलंय. सिक्युरिटीजतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ठाकूर म्हणाले की, ‘सट्टेबाजीला अधिकृत मान्यता दिल्यास गैरप्रकारांना आळा बसून अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. तसेच सामनानिश्चितीबाबतच्या घटना रोखता येतील.’ देशात सट्टेबाजीला अधिकृत मान्यता देण्यासाठी कार्यरत असलेल्या तसेच पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अर्धवेळ सदस्य असलेल्या नीलेश शाह यांच्या सूचनेला उत्तर देताना ठाकूर यांनी हे वक्तव्य केलं आहे.

शाह म्हणाले की, ‘‘पैज लावणं हे भारतीयांच्या रक्तातच आहे. लास वेगास, मकाऊ तसंच नेपाळसारख्या ठिकाणी सट्टेबाजीला अधिकृत मान्यता आहे. त्यामुळंच जुगार किंवा सट्टेबाजीला अधिकृत मान्यता देण्यात यावी, अशी माझी सूचना आहे.’’

यावर प्रत्युत्तर देताना ठाकूर यांनी सांगितले की, ‘‘ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये सट्टेबाजीला अधिकृत मान्यता आहे. त्यामुळं देशाला कोटय़वधी रुपयांचा महसूल मिळतो. हा पैसा अन्य कामांसाठी तसेच खेळाच्या सुधारणेसाठी वापरता येऊ शकतो. सट्टेबाजीची पद्धत रूढ असते. सट्टेबाजीशी निगडित असलेल्यांना ही पद्धत योग्य ठरू शकेल. सट्टेबाजीमुळं सामनानिश्चितीसारखे प्रकार रोखता येऊ शकतील.’’

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा