गोल पोस्ट agralekh अग्रलेख जागतिक दादागिरी

जागतिक दादागिरी

जगातील युद्धे थांबवण्याचा दावा करून, नोबेल शांतता पुरस्कारासाठी धडपड करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल न देऊन निवड समितीने पुरस्काराची उंची कायम ठेवली, हे व्हेनेझुएलावरील हल्ल्यातून प्रकर्षाने पुढे आले. इतर देशांत नाक खुपसून, त्यांच्या कारभारात हस्तक्षेप करायचा, आपल्या सोईची नसलेली सरकारे उलथवून टाकायची आणि तिथली बांडगुळे सत्तेवर बसवून आपल्याला हवी तशी लूट करायची, ही अमेरिकेची जुनीच खोड आहे. ट्रम्प यांच्याही ती नसानसांत भिनली असून, आता त्यांचे लक्ष्य कोलंबिया, क्युबा आणि भारत आहे. जगाने वेळीच अशा दांडगाई प्रवृत्तीला रोखले नाही, तर जग पुतीन-ट्रम्प-शी वृत्तीच्या कह्यात जाईल.

अमेरिका संपन्न राष्ट्र असले, तरी तिच्या संपन्नेतेला रक्ताचे डाग आहेत. अन्य देशातील खनिज संपत्ती लुटण्यासाठी तिथली सरकारे उलथवून टाकायची, तिथे रक्तपात घडवायचा हे प्रकार वारंवार घडले आहेत. एकीकडो लोकशाहीचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे दुसऱ्या देशात सत्तेवर कोणाला ठेवायचे, सत्ता कुणाकडे द्यायची, हा त्या देशातील नागरिकांचा हक्कच हिरावून घ्यायचा, ही अमेरिकेची दमनशाही आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात तर एकाधिकारशाही पुरेपूर भिनलेली. मीपणा आणि अहंकारी वृत्ती सोबतीला. त्यांच्या पूर्वसुरी अध्यक्षांनी इराकच्या तेलावर कब्जा मिळवण्यासाठी सद्दाम हुसेनला गुन्हेगार ठरवले, आता ट्रम्प तेच व्हेनेझुएलाबाबत करीत आहेत. रशियाने युक्रेनमध्ये आक्रमण केले, म्हणून पूर्वी रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांच्याविरोधात गळा काढणारे आणि नंतर युक्रेनलाच काही भागावर पाणी सोडण्याचा सल्ला देणारे ट्र्प आता जगातील अनेक देशांवर काहीही आरोप ठेवून हल्ले करीत आहे.

व्हेनेझुएलाच्या मातीखाली दडलेल्या खजिन्याने जगाला, विशेषतः अमेरिकेला वेडे केले आहे. तिचा त्या खनिजांवर डोळा आहे. युक्रेनची पाठराखणही तिथल्या खनिज संपत्तीवर डोळा ठेवूनच ट्रम्प करीत होते, हे वेगळे सांगायला नको. तेल, सोने आणि खनिजांचे साठे कोणत्याही देशाला महासत्ता बनवू शकतात; पण सर्वकाही इतके मौल्यवान असूनही आज व्हेनेझुएला गरिबी, कर्ज आणि अराजकतेचा सामना करीत आहे. हा विरोधाभास या खजिन्याच्या ग्रहणाची खरी कहाणी आहे. व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वात मोठे तेल साठे आणि प्रचंड सोन्याचे साठे आहेत. जगाच्या एकूण साठ्यापैकी वीस टक्के तेल एकट्या व्हेनेझुएलात आहेत. असे असूनही जमिनीवरील वास्तव खूप वेगळे आहे. प्रश्न फक्त तेल काढण्याचा नाही, तर दशकांपासून कोसळत असलेल्या व्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याचा आहे. ट्रम्प यांच्यासमोरील हे सर्वात मोठे आव्हान आहे. ट्रम्प व्हेनेझुएलामध्ये आपले हात का पोळून घेत आहेत, असा प्रश्न पडतो. व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वात मोठे तेल साठे आहेत. हे सौदी अरेबियापेक्षा जास्त आहे. शिवाय, आग्नेय प्रदेशात पसरलेल्या गयाना शील्डमध्ये हजारो टन सोने आणि इतर खनिजे आहेत. म्हणूनच हा देश केवळ लॅटिन अमेरिकाच नाही, तर संपूर्ण जगाच्या भूराजकारणात महत्त्वपूर्ण स्थान राखतो. त्याचे भौगोलिक स्थान हे त्याचे सामर्थ्य आहे. पश्चिमेकडील अँडीज पर्वत आणि आग्नेय दिशेला लाखो वर्षे जुने गयाना शील्ड यांच्यामधील विशाल ओरिनोको नदीचे खोरे या प्रदेशाला संसाधनांचा खजिना बनवते. ओरिनोको बेल्ट सुमारे ५५ हजार चौरस किलोमीटर पसरलेला आहे. तो जगातील सर्वात मोठ्या अतिरिक्त-जड कच्च्या तेलाच्या साठ्यांपैकी एक मानला जातो. ओरिनोको बेल्टमध्ये १,२०० ते १,४०० अब्ज पिंप तेलसाठे असू शकतात. ‘यूएस जिओलॉजिकल सर्व्हे’नुसार, या तेलाचे ३८०-६५२ अब्ज पिंप तेल तांत्रिकदृष्ट्या काढता येण्याजोगे आहे. हे स्वप्नासारखे वाटते; परंतु समस्या त्याच्या गुणवत्तेत आहे. हे तेल अतिरिक्त-जड आहे, म्हणजे ते खूप जाड, चिकट आणि काढणे अत्यंत महाग आहे.

ते जमिनीतून बाहेर काढण्यासाठी स्टीम इंजेक्शन, डायल्युशन आणि अपग्रेडिंगसारख्या महागड्या तंत्रांची आवश्यकता असते. व्हेनेझुएलाच्या सरकारी मालकीच्या कंपनी ‘पीडीव्हीएसए’कडे आधुनिक तंत्रज्ञान आणि पैशांचा अभाव आहे. पाईपलाईन ४० ते ५० वर्षे जुन्या आहेत. रिफायनरीज जीर्ण अवस्थेत आहेत आणि वर्षानुवर्षे त्यांची देखभाल केली गेलेली नाही. गयाना शील्ड तेलासोबतच, सोने ही व्हेनेझुएलाची सर्वात मोठी संपत्ती आहे. गयाना शील्डमध्ये दहा हजार टनांहून अधिक शोषणयोग्य सोने असल्याचा अंदाज आहे. बोलिव्हर स्टेटसारख्या भागात सोन्याचे शेकडो साठे आहेत; परंतु सोन्याच्या खाणीचा मोठा भाग बेकायदेशीर आहे. जंगलतोड, नद्यांमधील पारा प्रदूषण आणि आदिवासी भागात हिंसाचार आदी समस्यांचा सामना करावा लागत आहे. सरकारकडे त्यावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता नाही किंवा पर्यावरणाचे रक्षण करण्याची ठोस योजना नाही. असे असताना ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर हल्ला केला. त्यासाठी जी कारणे दिली, तीही तितकीशी समर्थनीय नाहीत.

व्हेनेझुएलातील चीन आणि रशियाच्या वाढत्या प्रभावाचा सामना करण्यास अमेरिकेने प्राधान्य दिले आहे. मनोरंजक म्हणजे, अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये ‘पीडीव्हीएसए’च्या अनेक प्रमुख सुविधांना जाणूनबुजून नुकसान केले नाही. भविष्यातील अमेरिकन कंपन्यांसाठी मार्ग खुला ठेवणे हा स्पष्ट संकेत आहे. ट्रम्प म्हणतात, की शेवरॉन, कोनोकोफिलिप्स आणि एक्सॉनसारख्या प्रमुख तेल कंपन्या उत्पादन वाढवण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करतील. तथापि, सध्याची वास्तविकता अशी आहे, की व्हेनेझुएलाचे तेल उत्पादन, जे एकेकाळी दररोज ३५ लाख पिंप होते, ते आता फक्त दहा लाख पिंपावर आले आहे. शेवरॉन ही एकमेव कंपनी दररोज सुमारे दीड लाख पिंप कच्चे तेल काढते. तज्ज्ञांचे मत आहे, की केवळ पैसे देऊन परिस्थिती बदलणार नाही. येथे राजकीय स्थिरता, कायदेशीर संरक्षण आणि तांत्रिक सुधारणांची आवश्यकता आहे. व्हेनेझुएलाच्या तिजोरीसमोरील संकटाची कारणे अनेक थरांमध्ये आहेत. तिथल्या पायाभूत सुविधा पूर्णपणे कोसळल्या आहेत. त्यांची दुरुस्ती करण्यासाठी अंदाजे ५८ अब्ज डॉलर खर्च येऊ शकतो. जास्त प्रमाणात कच्च्या तेलासाठी महागड्या आणि विशेष तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे.

कुशल कामगारांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. निर्बंध आणि राजकीय अनिश्चितता गुंतवणूकदारांना रोखतात. अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतरही, व्हेनेझुएलाचे तेल क्षेत्र एका रात्रीत पुनरुज्जीवन होणार नाही. इराक आणि लिबिया ही याची उदाहरणे आहेत. तेथे हस्तक्षेप असूनही, तेल क्षेत्राचा जनतेला त्वरित फायदा झालेला नाही. येथे सर्वात मोठा धोका म्हणजे संक्रमण. जर सत्तेत बदल झाला, जर परिस्थिती अशीच राहिली किंवा देशांतर्गत विरोध वाढला, तर परदेशी कंपन्या माघार घेऊ शकतात. शिवाय, जागतिक तेल बाजारपेठ आधीच जास्त पुरवठ्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे व्हेनेझुएलाच्या तेलाचा किमतींवर लगेच परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. केवळ संसाधने असणे पुरेसे नाही, तर त्यांचे व्यवस्थापन करण्याची क्षमतादेखील आवश्यक आहे. कित्येक दशकांचे गैरव्यवस्थापन कोणत्याही खजिन्याला निरुपयोगी बनवू शकते. निर्बंध आणि राजकारण प्रथम पायाभूत सुविधांवर परिणाम करते. स्थिरतेशिवाय, गुंतवणूक कागदापुरती मर्यादित राहते. व्हेनेझुएलाच्या उदाहरणावरून असे दिसून येते, की जमिनीखाली दबलेला खजिना केवळ तेव्हाच उपयुक्त आहे, जेव्हा व्यवस्था जमिनीवर मजबूत असेल.

अमेरिकन कंपन्यांचे हीत आणि मादुरो यांच्यानंतरचा काळ या सर्वांचा एकत्रितपणे परिणाम जाणवण्यास ५ ते ७ वर्ष जाऊ शकतात; परंतु सध्या तरी, हा खजिना चमकण्यापूर्वी अनेक संकटाचा सामना करावा लागणार आहे. व्हेनेझुएला आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या नौदल नाकेबंदीचा सामना करत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अमेरिका कॅरिबियन प्रदेशात आपले लष्करी दल उभारत आहे. फोर्ड विमानवाहू जहाजदेखील या कारवाईत सहभागी आहे. दोन्ही देशांमधील वादाचा मुख्य स्रोत तेल आणि वायू आहे. तथापि, अमेरिकेचा असाही आरोप आहे, की व्हेनेझुएलाचे सरकार बेकायदेशीर ड्रग्ज व्यापारात सहभागी आहे. त्याचा अमेरिकन नागरिकांवर विपरीत परिणाम होत आहे. २०२५ मध्ये अमेरिकेने ‘ऑपरेशन सदर्न स्पियर’ सुरू केले आणि कॅरिबियन समुद्रात व्हेनेझुएलाच्या कथित ड्रग्ज तस्करी करणाऱ्या जहाजांवर हवाई हल्ले केले. अमेरिकन नौदलाच्या विमानांनी आतापर्यंत किमान २५ टँकरवर हल्ला केला आहे. ट्रम्प प्रशासन थेट आरोप करते, की व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो स्वतः बेकायदेशीर ड्रग्ज व्यापारात सहभागी आहेत. अमेरिकेचा दावा आहे, की मादुरो एक ‘नार्को-दहशतवादी’ संघटना चालवतात आणि अमेरिकेत ड्रग्जची तस्करी करत आहेत. फिर्यादी स्वत, तपास अधिकारीही स्वत आणि न्यायदानही स्वतःकरायचे, ही अमेरिका आणि ट्रम्प यांची नीती असून, पुढील काळात क्युबा, कोलिंबिया हे दक्षिण अमेरिकेतील देश आणि त्यानंतर ब्राझील आणि भारत हे ‘ब्रिक्स’ परिषदेतील देश अमेरिकेचे लक्ष्य असतील. व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतरच्या अमेरिकेतून आलेल्या प्रतिक्रिया त्याच्याच द्योतक आहेत.

भागा वरखडे

error: Content is protected !!
Exit mobile version