पुणे, 16 ऑक्टोंबर 2021: 116 देशांच्या ग्लोबल हंगर इंडेक्स (GHI) 2021 मध्ये भारत 101 व्या क्रमांकावर घसरलाय. गेल्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये 107 देशांमध्ये भारताचा 94 वा क्रमांक होता. या निर्देशांकात भारत आपल्या शेजारी देश पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळच्याही मागं आहे. अहवालात असं म्हटलं गेलंय की भारतातील लोक कोविड -19 आणि त्यामुळं घातलेल्या निर्बंधांमुळं वाईट रीतीनं प्रभावित झाले आहेत.
भारतात भुकेची चिंताजनक पातळी
आयरिश एजन्सी कन्सर्न वर्ल्डवाइड आणि जर्मन संस्था वेल्ट हंगर हिल्फे यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या अहवालात भारतातील भुकेची पातळी ‘चिंताजनक’ असल्याचं वर्णन केलंय. अहवालानुसार, नेपाळ (76), बांगलादेश (76), म्यानमार (71) आणि पाकिस्तान (92) हे शेजारी देशही ‘चिंताजनक’ उपासमारीच्या श्रेणीत आहेत. चीन, ब्राझील आणि कुवैतसह अठरा देशांनी अव्वल स्थान मिळवले आहे. त्यांचा GHI स्कोअर पाचपेक्षा कमी आहे. भारताचा GHI स्कोअर 27.5 आहे.
चार निर्देशकांचा वापर करून केली जाते GHI ची गणना
जीएचआय गुणांची गणना चार संकेतकांवर केली जाते – अंडर नरिशमेंट; चाइल्ड वेस्टिंग (पाच वर्षांखालील मुले जे त्यांच्या उंचीच्या मानाने कमी वजनाची आहेत), चाइल्ड स्टंटिंग (पाच वर्षांखालील मुले जे त्यांच्या वया मानाने उंचीने कमी आहेत) आणि चाइल्ड मॉर्टेलिटी-बालमृत्यू (पाच वर्षांखालील मुलांचा मृत्यू दर). GHI सीवियरटी स्केलवर 9.9 पेक्षा कमी किंवा समान गुण कमी मानला जातो. 10–19.9 चा स्कोअर मध्यम, 20.0–34.9 गंभीर, 35.0–49.9 चिंताजनक मानला जातो आणि 50.0 पेक्षा जास्त किंवा समान स्कोअर अत्यंत चिंताजनक मानला जातो.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे