Global Pulotsav 2025: पुलंच्या साहित्याला मी पूरक चित्रे रेखाटू शकलो हा मी माझा भाग्ययोग समजतो. पुलंच्या शब्द प्रवासाचा, मी निःशब्द सहप्रवासी आहे, अशी नम्र भावना ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी व्यक्त केली. पुलंचा २५ वा स्मृतिदिन व सुनीताबाईंच्या जन्मदिनाचे औचित्य साधून, करोना काळात बंद पडलेला ‘ग्लोबल पुलोत्सव’ पुन्हा सुरु झाला आहे. या ‘ग्लोबल पुलोत्सवा’ निमित्त बालगंधर्व कलादालन येथे आयोजित महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांनी पु.ल. आणि त्यांच्या साहित्यास समर्पित केलेल्या व्यंगचित्रांच्या आणि चिंतामणी हसबनीस यांच्या ब्रेल चित्रांच्या खास प्रदर्शनाचे उद्घाटन आज नाबाद शंभरीतील ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द.फडणीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना शि.द. फडणीस म्हणाले की, पुलं हे केवळ विनोदी लेखन करणारे साहित्यिक नव्हते, तर त्यांना सामाजिक प्रश्नांची देखील जाणीव आणि भान होते. सामाजिक भानाच्या अनुषंगाने त्यांचे काही स्वगत देखील होते, मात्र ते स्वगत त्यांच्या विनोदी साहित्याला मिळालेल्या हश्या आणि टाळ्यांच्या आवजात ऐकू गेले की नाही, अशी शंका येते. रवींद्रनाथ टागोर आणि चार्ली चॅप्लीन यांचा मिलाप केल्यास आपल्याला पुलंचे दर्शन होते. पुलंच्या व्यक्तिमत्वामध्ये टागोरांचे तत्वज्ञान आणि चार्ली चॅप्लीनची खेळकर वृत्ती याचा अचूक संयोग दिसून येतो. आजच्या प्रदर्शनात मांडण्यात आलेली व्यंगचित्रे पाहताना जुन्या आठवणी मनात जाग्या झाल्या आहेत. तसेच ब्रेल लिपीच्या माध्यमातून चिंतामणी हसबनीस यांनी दुसऱ्या जगातील व्यक्तींपर्यंत चित्रे पोहोचविण्याचा केलेला प्रयत्न अतिशय अवघड पण तितकाच स्तुत्य आहे.
सागर पवार यांनी काढलेल्या अर्कचित्राचे अनावरण शि.द. फडणीस यांच्या हस्ते करून या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. पु.ल. आणि त्यांच्या साहित्यास समर्पित केलेले हे व्यंगचित्र प्रदर्शन पाहताना शि.द. फडणीस भावूक झाले होते. यावेळी लोकमान्य सिल्व्हर विंडो क्लब प्रस्तुत सुधीर मोघे दिग्दर्शित ‘या सम हा’ या पुलंवरील चित्रपटाचा आनंद शि.द. फडणीस यांच्यासह उपस्थित रसिकांनी घेतला.
‘कोहिनूर’ प्रस्तुत व ‘लोकमान्य मल्टी पर्पज को ऑप सो. लि’ आयोजित या महोत्सवाचे सह- प्रयोजक ‘बेलवलकर सांस्कृतिक मंच’, ‘लोकमान्य कल्चरल फौंडेशन’ व ‘प्रथमेश कन्स्ट्रुक्शन’ आहेत. या महोत्सवास ‘NFDC – राष्ट्रीय चित्रपट संग्रहालंय’, ‘कार्टूनिस्ट कंबाइन’ व ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. यावेळी व्यासपीठावर या महोत्सवाचे स्वागताध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव, ‘कार्टूनिस्ट कंबाइन’चे अध्यक्ष संजय मिस्त्री, प्रसिध्द चित्रकार चिंतामणी हसबनीस, प्रसिध्द व्यंगचित्रकार कार्टुनिस्ट कंबाईनचे चारुहास पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ‘कार्टूनिस्ट कंबाइन’ चे अध्यक्ष संजय मिस्त्री यांनी व्यंगचित्र प्रदर्शन आयोजित करण्यामागील भूमिका विशद केली.
पुलंना भावलेल्या चित्रपटांच्या विशेष महोत्सवाचे उद्घाटन;
‘ग्लोबल पुलोत्सवा’निमित्त एन.एफ.ए.आय. थिएटर येथे लोकमान्य सिल्व्हर विंडो क्लब प्रस्तुत पुलंना भावलेल्या चित्रपटांच्या विशेष महोत्सवाचे उद्घाटन आज दुपारी ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी लोकमान्य मल्टिर्पपज को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.चे सुशील जाधव, महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार, मुकुल मारणे आणि आभा औटी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुलंनी ‘ती फुलराणी’ हे अजरामर नाटक ज्या चित्रपटाने प्रेरीत होवून लिहिले तो ‘पिग्मेलियन’ हा चित्रपट दाखविण्याात आला.या चित्रपट महोत्सवात बुधवार दिनांक ११ जून रोजी दुपारी २.०० वाजता एन.एफ.ए.आय. येथे पुलंनी ’एका कोळियाने’ हे गाजलेले पुस्तक ज्या चित्रपटाने प्रेरीत होवून लिहिले तो ‘द ओल्ड मॅन अँड द सी’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. तर गुरूवार दिनांक १२ जून रोजी दुपारी २.०० वाजता एन.एफ.ए.आय. येथे पुलंनी प्रभावित होवून जे ‘सुंदर मी होणार’ हे नाटक लिहिले तो ‘द बॅरेट ऑफ विंपॉल स्ट्रीट’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी










































