गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये विशेष नियंत्रण व्यवस्था ठेवा : केंद्रेकर

4

औरंगाबाद, दि.२७ मे २०२० : पावसाळ्यात प्रामुख्याने नदी काठच्या गावांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील गोदावरी काठच्या १५७२ गावांमध्ये प्राधान्याने विशेष नियंत्रण व्यवस्था तयार ठेवावी. या ठिकाणांसह ज्या गावांमध्ये, वसाहतींमध्ये अति पर्जन्यमानाची शक्यता आहे, तसेच गेल्या वर्षात ज्या-ज्या ठिकाणी जास्त पाऊस कोसळला, अशा सर्व ठिकाणची गावे स्थलांतरासाठी पर्यायी व्यवस्था, शाळा इतर सुरक्षित ठिकाणे तयार ठेवावी. त्या जागी पिण्याचे पाणी, जेवणाची योग्य व्यवस्था राहील याची काळजी घेण्याबाबतचे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय मान्सून पूर्वतयारी बाबतची बैठक विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ( दि.२६)रोजी पार पडली. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस औरंगाबादचे जिल्हाथिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडे, महसूल उपायुक्त पराग सोमण, उपायुक्त वर्षा ठाकूर, विभागीय आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश लोखंडे यांच्यासह मराठवाड्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेने सर्व तलाव, पाझर तलाव, नद्या काठची गावे या सर्वांची प्रत्यक्ष पाहणी करून संरक्षणाचे उपाय योजावे. ज्या ठिकाणी तलाव, धरणाच्या भिंती, दरवाजे आदींची दुरुस्ती गरजेची असल्यास ती तत्काळ करावी. धोकादायक तलाव, पाझर तलाव तसेच धरणे आहेत तिथे २४ तास देखरेख यंत्रणा तयार ठेवावी. महावितरणने विद्युत खांब, विद्युत प्रवाह करणाऱ्या तारा या वादळाच्या स्थितीत धोकादायक बनणार नाहीत याची कटाक्षाने खबरदारी घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व रस्ते इमारती यांची पाहणी करून घ्यावी. लाईफ जॅकेट, बोटी व इतर अनुषांगिक उपाययोजना सज्ज ठेवाव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी यावेळी दिले आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा