नवी दिल्ली २८ जून २०२३: जागतिक एथलेटिक्स चॅम्पियनशिप १९ ऑगस्टपासून सुरू होईल आणि २७ ऑगस्टला संपेल. या चॅम्पियनशिपमध्ये देशाचा गोल्डन बॉय आणि ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा भारताचे नेतृत्व करेल. जागतिक एथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या इतिहासात भारताने आतापर्यंत केवळ २ पदके जिंकली आहेत. ही स्पर्धा बुडापेस्ट, हंगेरी येथे आयोजित करण्यात आलीय.
दोहा डायमंड लीगमध्ये अव्वल स्थान मिळवल्यानंतर नीरज ने २०२३ मध्ये चांगली सुरुवात केली होती. मात्र, दुखापतीनंतर तो कुठेही सहभागी झाला नाही. दुखापतीमुळे तो यापूर्वी एफबीके गेम्स आणि पावो नूरमी गेम्सला मुकला होता. नीरज चोप्रा हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सध्या सावरत आहे. जागतिक एथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ च्या पात्रता प्रक्रियेत देशाचा अव्वल दर्जाचा भालाफेकपटू नीरज चोप्रा, लुसाने डायमंड लीगमधील स्पर्धेसाठी पात्र ठरला, त्यासाठी त्याने ८९.०८ मीटर भाला फेकून ८५.२० मीटरचा कट-ऑफ क्लिअर केला. तो आता ३० जून रोजी लुसाने येथे होणाऱ्या डायमंड लीगमध्ये पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे.
गेल्या वर्षी यूजीनमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतातील एकूण २३ खेळाडूंनी भाग घेतला होता. नीरज चोप्रा २०२२ यूजीनमध्ये रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला. यापूर्वी २००३ मध्ये, अंजू बॉबी जॉर्जने महिलांच्या लांब उडी अजिंक्यपद स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक जिंकून इतिहास रचला होता.
नीरज चोप्रा सोबतच जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ साठी पात्र झालेले भारतीय खेळाडू, अविनाश साबळे (पुरुष ३००० मीटर स्टीपलचेस), जेस्विन आल्ड्रिन (पुरुषांची लांब उडी), एम श्रीशंकर (पुरुषांची लांब उडी), प्रवीण चित्रवेल (पुरुषांची तिहेरी उडी), तजिंदरपाल सिंग तूर (पुरुषांचा शॉट पुट), अक्षदीप सिंग (पुरुषांची २० किमी शर्यत चालणे), विकास सिंग (पुरुषांची २० किमी शर्यत चालणे), परमजीत बिश्त (पुरुषांची २० किमी शर्यत चालणे), राम बाबू (पुरुषांची ३५ किमी शर्यत चालणे), प्रियांका गोस्वामी (महिला २० किमी रेस वॉक)
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.